How Hormonal Imbalance Can Cause Cancer: धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मात्र, या समस्येकडे केवळ सामान्य शारीरिक बदल म्हणून पाहणे जीवावर बेतू शकते. महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) या हार्मोन्सच्या पातळीत होणारा बदल कर्करोगासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

गायनोकोलॉजिस्ट डॉ. रुपिंदर सेखोन यांनी या विषयावर प्रकाश टाकला असून, हार्मोनल असंतुलन आणि कॅन्सरचा संबंध कसा असतो, हे सविस्तर सांगितले आहे.

हार्मोनल असंतुलन आणि कॅन्सरचा संबंध

महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन अत्यंत महत्त्वाचे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स केवळ मासिक पाळीच्या चक्रावरच नियंत्रण ठेवत नाहीत, तर स्तनांचे आरोग्य, गर्भाशय (Uterus) आणि अंडाशय (Ovaries) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावरही परिणाम करतात. डॉ. सेखोन यांच्या मते, जेव्हा हे हार्मोन्स दीर्घकाळ असंतुलित राहतात, तेव्हा शरीरातील पेशींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे प्रामुख्याने स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Award Banner

पीसीओएसकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

आजच्या काळात अनेक तरुणी आणि महिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) या समस्येचा सामना करत आहेत. अनेकदा याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र, डॉक्टरांच्या मते दीर्घकाळ राहणारे PCOS हे गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते. याशिवाय खालील घटकही कर्करोगाचा धोका वाढवतात:

  • अत्यंत कमी वयात मासिक पाळी सुरू होणे.
  • मेनोपॉज (रजोनिवृत्ती) खूप उशिरा येणे.
  • लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव.

‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी शरीरातील बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डॉ. सेखोन यांनी खालील काही लक्षणांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.

१. सततचा थकवा: पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा थोडेही काम न करता थकल्यासारखे वाटत असेल, तर हे चिंतेचे कारण असू शकते. जर हा थकवा ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. पचनाच्या समस्या: जर तुम्हाला दीर्घकाळापासून पचनाच्या तक्रारी, गॅस, अपचन किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर याकडे केवळ ‘गॅस्ट्रिक’ समस्या म्हणून पाहू नका. हे शरीरातील अंतर्गत बदलांचे लक्षण असू शकते.

३. अचानक वजन कमी होणे: कोणताही व्यायाम किंवा डाएटिंग न करता जर तुमचे वजन अचानक आणि वेगाने कमी होत असेल, तर हे धोक्याचे लक्षण आहे. शरीरातील मेटाबॉलिजममध्ये होणारे हे बदल गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

कसा टाळाल धोका?

तज्ज्ञांच्या मते, हार्मोनल संतुलन राखण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणावाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. वर्षातून किमान एकदा तरी महिलांनी आपली संपूर्ण हेल्थ चेकअप करून घेतले पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झाल्यास कर्करोगासारख्या आजारावर यशस्वी उपचार करणे शक्य आहे.

“हार्मोनल बदल हे केवळ मासिक पाळीशी संबंधित नसून ते तुमच्या संपूर्ण आरोग्याचा आरसा आहेत. शरीराच्या कोणत्याही असामान्य संकेतांकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते”, असा सल्ला डॉ. रुपिंदर सेखोन यांनी दिला आहे.