Blood Sugar Level Walking Time : रक्तातील साखर वाढण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘हायपरग्लायसेमिया’ (Hyperglycemia) असे म्हणतात. आपल्या शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) ‘इन्सुलिन’ नावाचे संप्रेरक (Hormone) तयार करते. हे इन्सुलिन अन्नातून मिळणाऱ्या ग्लुकोजला शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवून त्याचे ऊर्जेत रुपांतर करते. मात्र, जेव्हा शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत, तेव्हा ग्लुकोज रक्तात साचू लागते आणि ब्लड शुगर वाढते.

तज्ज्ञ काय सांगतात?

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यातही चालणे (Walking) हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे शरीरातील स्नायू ग्लुकोजचा वापर करतात, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.

दररोज ३० मिनिटे वॉक: एका निरोगी व्यक्तीने आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम केला पाहिजे. यासाठी दररोज साधारण ३० मिनिटे वेगाने चालणे (Brisk Walk) पुरेसे ठरते.

१०-१० मिनिटांचे टप्पे: जर कोणाला सलग ३० मिनिटे चालणे शक्य नसेल, तर ते दिवसातून १०-१० मिनिटांचे तीन टप्पे करूनही चालले तरी चालते.

मधुमेहाच्या रुग्णांनी काय करावे?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवण झाल्यानंतर काही वेळ चालणे खूप फायदेशीर ठरते.

जेवणानंतर १०-१५ मिनिटे चाला: जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटे हलक्या किंवा मध्यम वेगाने चालल्यास शरीराला ग्लुकोजचा प्रभावी वापर करण्यास मदत होते.

स्वतःच्या क्षमतेनुसार चाला: चालण्याचा वेळ आणि गती ही व्यक्तीचे वय, आरोग्य, वजन, फिटनेस आणि ब्लड शुगरच्या पातळीनुसार बदलू शकते. चालताना अतिशय थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटल्यास तातडीने थांबावे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या: जे रुग्ण मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन घेतात, त्यांनी व्यायामादरम्यान शुगर एकदम कमी (Hypoglycemia) होणार नाही याची काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपला व्यायामाचे रुटीन ठरवा.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

फक्त चालल्याने मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही. त्यासह संतुलित आहार, पुरेशी झोप, वजनावर नियंत्रण, वेळेवर औषधे घेणे आणि नियमित ब्लड शुगर तपासणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.