Sleeping hours according to Ayurveda: आजकाल जवळजवळ प्रत्येकाचे झोपेचे चक्र लक्षणीयरीत्या विस्कळीत झाले आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणे, फोन सतत स्क्रोल करीत राहणे, रात्री उशिरापर्यंत जागणे या चुकीच्या सवयींमुळे झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडले आहे. काही लोक सकाळी लवकर उठतात; पण रात्री उशिरा झोपतात. परिणामी, जेमतेम पाच-सहा तासांची झोप घेणे हे दिवसेंदिवस सामान्य होत चालले आहे. आरोग्यदायी जीवनशैलीत झोपेचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तरीही संभ्रमामुळे काही लोकांना पाच-सहा तासांची झोप पुरेशी वाटते; तर काहीना ८-१० तासांची झोप हवीहवीशी वाटते. आता प्रश्न असा आहे की, खरोखर किती तासांची झोप सर्वोत्तम आहे? यावर आयुर्वेद काय सांगतो? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ…

आयुर्वेदानुसार किती तासांची झोप आवश्यक?

जर तुम्ही सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल, तर तुम्हाला काहीतरी अंतर्निहित समस्या असू शकते. मात्र, जर तुम्ही आठ तासांपेक्षा जास्त झोपत असाल, त ते एखाद्या अंतर्निहित समस्येचे लक्षण असू शकते. एकूणच, आयुर्वेद किमान सहा तास आणि कमाल आठ तास झोपेची शिफारस करतो. जर तुम्हाला इतकी झोप मिळत असेल, तर ती तुमच्या शरीरासाठी पुरेशी आहे. तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या आणि गरजा यांनुसार तुमच्या झोपेच्या वेळा समायोजित करू शकता.

गाढ आणि चांगली झोप घेणे महत्त्वाचे

केवळ किमान तास झोप घेतली जातेय का हे पाहणेच पुरेसे नाही, तर झोपेची गुणवत्ता त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.आयुर्वेद आणि इतर धर्मग्रंथांनुसार, योग्य वेळी गाढ झोप घेणारी व्यक्ती आनंदी, सुदृढ, तल्लख अन् बलवान असते. अशा व्यक्तीमध्ये वाढलेली जीवनशक्ती, तेज, ज्ञान आणि दीर्घायुष्य अशा गोष्टी असल्याची प्रचिती आपल्याला येते.

रात्री १० ते पहाटे ४ च्या दरम्यान झोपणे तुमच्या शरीरासाठी सर्वांत फायदेशीर आहे. ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४ वाजता उठून आपल्या दिवसाची सुरुवात करा. जर तुम्ही एक तास उशिरा म्हणजे रात्री ११ वाजता झोपायला गेलात, तर तुम्ही पहाटे ५ वाजता उठू शकता. या वेळेत अर्ध्या तासाचा बदल होऊ शकतो; परंतु त्यापेक्षा उशिरा उठणे टाळा.

झोपण्याची योग्य पद्धत कोणती?

आयुर्वेदानुसार, गाढ आणि चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही हात आणि पाय सरळ ठेवून झोपले पाहिजे. तुम्ही कुशीवर झोपू शकता; पण तुमचे हात आणि पाय नेहमी सरळ ठेवा. त्याशिवाय तुमची उशी खूप जाड असणार नाही याची काळजी घ्या.