How Many Custard Apples to Eat Daily? पावसाळा संपल्यानंतर बाजारात सीताफळांची आवक वाढते. गोड, मऊ आणि चविष्ट गर असलेले सीताफळ अनेकांच्या आवडीचे फळ आहे. चवीसोबतच हे फळ शरीराला काही महत्त्वाचे पोषक घटकही पुरवते. मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणे महत्त्वाचे असते. सीताफळाच्या बाबतीतही हेच लागू होते. कारण आयुर्वेदानुसार सीताफळाची प्रकृती थंड असून, त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास कफाचा त्रास वाढू शकतो. ज्यांचे पचन कमकुवत आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी-खोकला होतो, त्यांनी हे फळ खाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
मग एका दिवसात किती सीताफळ खावे? कोणत्या लोकांनी हे फळ खाताना विशेष काळजी घ्यावी? थंड हवामानात सीताफळ खाण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत आयुर्वेद तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सीताफळ केवळ चविष्टच नाही, तर पोषक घटकांचाही खजिना
सीताफळ हे चवीला गोड आणि पौष्टिक गुणधर्मांनी युक्त असलेले हंगामी फळ आहे. आयुर्वेदानुसार सीताफळाची चव मधुर असून त्याची प्रकृती थंड असते. शरीराला बळ देणारे फळ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. आधुनिक पोषणशास्त्रानुसार सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे योग्य प्रमाणात या फळाचा आहारात समावेश करता येतो.
वात-पित्त शांत करते; पण कफाचा त्रास वाढू शकतो
डॉ. आस्था मिश्रा यांच्या मते, आयुर्वेदात सीताफळाला वात आणि पित्त दोष शांत करणारे फळ मानले जाते. मात्र, त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास कफ वाढण्याची शक्यता असते. सीताफळाची प्रकृती थंड असल्यामुळे ज्यांना आधीपासून सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास आहे, त्यांनी हे फळ खाताना विशेष काळजी घ्यावी. विशेष म्हणजे, प्रत्येकाची शारीरिक प्रकृती वेगळी असते. त्यामुळे सीताफळ खाताना आपल्या शरीराला ते कितपत मानवते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पचनशक्ती कमकुवत असणाऱ्यांनी सीताफळ खाताना काळजी घ्या
सीताफळ हे पचायला जड म्हणजेच गुरू गुणधर्माचे फळ मानले जाते. त्यामुळे ते पचवण्यासाठी शरीराला तुलनेने अधिक वेळ लागू शकतो. ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना मंदाग्नीचा त्रास आहे, त्यांनी सीताफळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. गरजेपेक्षा जास्त सीताफळ खाल्ल्यास पचनाशी संबंधित अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे चवीच्या मोहापायी एकाच वेळी भरपूर सीताफळ खाणे टाळावे.
थंडीच्या दिवसांत सीताफळ खाताना या गोष्टी लक्षात ठेवा
सीताफळाची प्रकृती थंड असल्याने थंड हवामानात त्याचे सेवन करताना प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्या किंवा कफाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.
- सर्दी-खोकला किंवा कफाचा त्रास असल्यास सीताफळ खाणे टाळावे किंवा वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- एकाच वेळी जास्त प्रमाणात सीताफळ खाऊ नये.
- पचनशक्ती कमकुवत असल्यास कमी प्रमाणात सेवन करावे.
- आपल्या प्रकृतीनुसार आणि पचनक्षमतेनुसार फळाचे प्रमाण ठरवावे.
एका दिवसात किती सीताफळ खावे? डॉक्टरांनी सांगितले प्रमाण
आयुर्वेदानुसार, एका दिवसात साधारण ५० ते १०० ग्रॅम सीताफळाचा गर खाणे पुरेसे ठरू शकते. मात्र, हे प्रमाण प्रत्येकासाठी सारखे असेलच असे नाही. वय, पचनशक्ती आणि शारीरिक प्रकृती यानुसार सीताफळाचे प्रमाण बदलू शकते. त्यामुळे सीताफळ आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचे अतिसेवन करू नये. योग्य प्रमाणात आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून खाल्ल्यास या हंगामी फळाचा आस्वाद घेता येईल.
