How Many Steps Should You Walk Daily to Lose 5 Kg of Weight: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त असून, लवकर वजन कसं कमी करायचं या प्रश्नाचा भुंगा त्या सर्वांच्या मनात गुंजारव करत राहतो. काही जण जिममध्ये तासन्‌ तास घाम गाळतात; तर काही जण चालण्याचा (वॉकिंग) पर्याय निवडतात. पण नेमकं रोज किती चाललं पाहिजे आणि पाच किलो वजन कमी करायला किती वेळ लागतो? याचं उत्तर जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

वाढती समस्या -जीवनशैलीचा परिणाम

आजकाल बसून काम करण्याची सवय, फास्ट फूडचं वाढतं सेवन व व्यायामाचा अभाव यांमुळे वजन वाढण्याची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. अनेक तरुणही यामुळे त्रस्त आहेत, ही चिंतेची बाब आहे.

वजन वाढण्याचे धोके कोणते?

वजन वाढणं ही केवळ सौंदर्याची समस्या नसून, ती अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, श्वसनाचे त्रास आणि हार्मोन्समध्ये बिघाड होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेवर वजन नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

Award Banner

तज्ज्ञांच्या मते, एक किलो वजन कमी करण्यासाठी सुमारे ७,७०० उष्मांक जाळावे लागतात. त्याचा अर्थ पाच किलो वजन कमी करण्यासाठी एकूण ३८,५०० उष्मांकांचे ज्वलन व्हायला हवे. हे ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यासाठी सातत्य आणि योग्य पद्धतीचे पालन केले जाणे गरजेचे असते.

स्टेप्स आणि वजन घटण्याचं गणित काय सांगतं?

जर तुम्ही तुमच्या आहारात कोणताही बदल केला नाही, तर फक्त चालण्यावर अवलंबून राहून वजन कमी करणं थोडं वेळखाऊ ठरू शकतं. साधारणपणे दररोज १०,००० पावलं चालल्यास सुमारे ३०० ते ४०० उष्मांक जळतात. या हिशोबाने, जर तुम्ही रोज १०,००० पावलं चालत असाल, तर पाच किलो वजन कमी करण्यासाठी सुमारे तीन ते चार महिने लागू शकतात.

मात्र, जर तुम्ही रोज १२,००० ते १५,००० पावलं चाललात, तर हा कालावधी थोडा कमी होऊ शकतो आणि परिणाम लवकर दिसू शकतो.

फक्त चालणं पुरेसं आहे का?

इथेच खरं ‘ट्विस्ट’ आहे! फक्त चालणं पुरेसं नसून, ते कसं चालता हे अधिक महत्त्वाचं आहे.

जलद चालणं (ब्रिस्क वॉकिंग): हळू चालण्याऐवजी थोड्या वेगात चालल्यास जास्त उष्मांक जळतात. श्वास थोडा वाढेल; पण बोलता येईल, अशा गतीने चालणं फायदेशीर ठरतं.
सातत्य: एक दिवस २०,००० पावलं चालण्यापेक्षा दररोज १०,००० पावलं चालणं अधिक परिणामकारक असतं.
८०/२० नियम: वजन कमी करण्यात ८०% वाटा आहाराचा आणि २०% व्यायामाचा असतो. जंक फूडसह साखरयुक्त व तेलकट पदार्थ कमी केल्यास वजन कमी होण्याचा वेग वाढू शकतो.

योग्य आहारासोबत किती लवकर कमी होईल वजन?

जर तुम्ही चालण्यासोबत संतुलित आहार पाळलात, तर पाच किलो वजन १.५ ते २ महिन्यांतही कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच केवळ पावलं चालणं नव्हे, तर तुमच्या जीवनशैलीत बदल करणं हीदेखील महत्त्वाची बाब ठरते.

निष्कर्ष:

वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नसतो. नियमित चालणं, योग्य आहार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळेच अपेक्षित परिणाम मिळू शकतात. आजपासूनच पावलं उचलली, तरच उद्या तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभू शकतं.