How Many Times Should You Poop a Day: सकाळची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा आणि मनःस्थिती अवलंबून असते. विशेषतः सकाळी शरीर हलके वाटणे, मन प्रसन्न होणे आणि कामात उत्साह जाणवणे यामागे एक महत्त्वाचे कारण असते, योग्य वेळेला व नीट झालेले मलविसर्जन. मात्र, अनेक जण या बाबीकडे दुर्लक्ष करतात. काहींना दिवसातून अनेकदा शौचास जावे लागते, तर काहींना दोन-दोन दिवस होत नाही. हे सर्व नेमके काय दर्शवते? यामागे आपल्या आरोग्याचे कोणते संकेत दडलेले असतात?
मलविसर्जन ही शरीराची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. पचनानंतर उरलेला निरुपयोगी व अपायकारक घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम या प्रक्रियेमुळे होते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याचा थेट परिणाम पचनसंस्था, आतडी, यकृत आणि एकूणच आरोग्यावर होऊ शकतो.
काही लोकांना वाटते की दिवसातून जितक्या जास्त वेळा शौचास जाता येईल तितके आरोग्य चांगले; तर काहींना वाटते की दोन दिवसांतून एकदाच मलविसर्जन होणेही सामान्य आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, मलविसर्जनाची वारंवारता ही प्रत्येक व्यक्तीच्या आहार, पाणी पिण्याची सवय, जीवनशैली आणि पचनशक्तीवर अवलंबून असते.
जर एखाद्या व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा शौचास जावे लागत असेल, तरीही पोट पूर्णपणे साफ झाल्यासारखे वाटत नसेल, तर हे पचनसंस्थेतील बिघाडाचे लक्षण असू शकते. यामागे आतड्यांचा संसर्ग, अन्न न पचणे, जंतुसंसर्ग, ताणतणाव किंवा काही गंभीर आजारही कारणीभूत असू शकतात. अशा वेळी दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.
दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला एक-दोन दिवस मलविसर्जन होत नसेल, तरी लगेच घाबरण्याची गरज नसते. काही वेळा आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असणे, पाणी कमी पिणे, प्रवास, दिनचर्येत बदल किंवा मानसिक ताण यामुळे असे होऊ शकते. मात्र, ही स्थिती वारंवार उद्भवत असेल तर बद्धकोष्ठतेचा धोका वाढू शकतो.
मग नेमके दिवसातून किती वेळा मलविसर्जन होणे आरोग्यदृष्ट्या योग्य आहे?
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून एक वेळ मलविसर्जन होणे सर्वसाधारणपणे सर्वात योग्य आणि आरोग्यदायी मानले जाते. दोन वेळा शौचास जाणेही काही लोकांसाठी नैसर्गिक असू शकते. तसेच २४ ते ३२ तासांच्या आत एकदा मलविसर्जन होत असेल तर तेही सामान्य श्रेणीत येते.
मात्र, यापेक्षा जास्त वेळा किंवा खूपच कमी वेळा मलविसर्जन होत असेल आणि त्यासोबत पोटदुखी, जडपणा, थकवा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते शरीर देत असलेले इशारे असू शकतात; त्यामुळे आपल्या शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, पुरेसे पाणी आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
लक्षात ठेवा नियमित, सुलभ आणि समाधानकारक मलविसर्जन हे चांगल्या आरोग्याचे महत्त्वाचे लक्षण आहे.
