Daily Hair Wash Tips: केस धुणे ही आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिला असो किंवा पुरुष, प्रत्येकजण केस आणि टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी हेअर वॉश करतो. मात्र केस धुण्याची पद्धत, किती वेळा केस धुवायचे आणि केस धुतल्यानंतर काय करायचे, याबाबत अनेक गैरसमज आहेत. विशेष म्हणजे, केस रोज धुतल्याने ते खराब होतात किंवा जास्त गळतात, असे अनेकांना वाटते. पण प्रत्येकाच्या केसांचा आणि टाळूचा म्हणजेच स्काल्पचा (scalp) प्रकार वेगळा असल्याने हे सर्वांसाठी सारखेच असेल असे नाही.
रोज केस धुतल्याने केस खराब होतात का?
त्वचारोगतज्ज्ञ आंचल पंथ यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जर तुमची टाळू आणि केस खूप तेलकट असतील तर रोज केस धुणेही योग्य ठरू शकते. यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेल, घाण आणि जमा झालेला थर स्वच्छ ठेवण्यास मदत होते. अनेक जण संपूर्ण आठवड्यात फक्त रविवारी केस धुतात. व्यस्त वेळापत्रकामुळे असे होत असले तरी खूप तेलकट टाळू असल्यास आठवड्यातून एकदाच केस धुणे पुरेसे ठरणार नाही. टाळूवर तेल साचल्यामुळे कोंडा किंवा इतर समस्या वाढू शकतात.
दररोज केस धुणे शक्य नसेल तर केसांच्या प्रकारानुसार आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केस धुवावेत. मात्र केस किती वेळा धुवायचे हे टाळू किती तेलकट आहे, केसांचा प्रकार आणि वैयक्तिक गरजांवर अवलंबून असते.
केस धुतल्यानंतर ‘या’ चुका अजिबात करू नका
केस धुण्याची योग्य पद्धत जितकी महत्त्वाची आहे, तितकेच केस धुतल्यानंतर त्यांची काळजी घेणेही गरजेचे आहे.
ड्रायर केसांच्या अगदी जवळ ठेवू नका
ओले केस लवकर सुकवण्यासाठी अनेक जण ब्लो ड्रायर अगदी केसांना चिकटवून वापरतात. मात्र जास्त उष्णतेमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ड्रायर केसांपासून किमान १५ सेंटिमीटर अंतरावर ठेवणे योग्य ठरते.
ओल्या केसांवर स्ट्रेटनर वापरू नका
ओल्या केसांवर स्ट्रेटनर किंवा कर्लर यांसारख्या हीटिंग टूल्सचा वापर करणे टाळा. केसांवर उष्णतेचा थेट परिणाम होऊन ते अधिक कमकुवत आणि तुटण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे हीटिंग टूल वापरण्यापूर्वी केस पूर्णपणे सुकलेले असावेत.
ओले केस घट्ट बांधू नका
केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे सुकण्यापूर्वी घट्ट वेणी किंवा जुडा बांधणे टाळा. ओले केस तुलनेने अधिक नाजूक असतात. चेहऱ्यावर केस येत असतील तर पुढचे काही केस हलक्या क्लॉ क्लिपने बाजूला करता येतात.
ओल्या केसांवर जोरात कंगवा फिरवू नका
केस धुतल्यानंतर लगेच जोरात कंगवा केल्याने केस तुटण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः बारीक दातांच्या कंगव्याऐवजी रुंद दातांचा कंगवा वापरणे अधिक सोयीचे ठरते. केस गुंतले असतील तर घाई न करता हळूहळू केस सोडवा.
मग योग्य Hair Wash Routine काय?
केस धुण्याचा एकच नियम प्रत्येकासाठी लागू होत नाही. तुमची टाळू तेलकट असेल तर वारंवार केस धुण्याची गरज भासू शकते, तर कोरड्या टाळूला तितक्या वारंवार हेअर वॉशची आवश्यकता नसेल. त्यामुळे ‘आठवड्यातून एकदाच केस धुवायचे’ किंवा ‘रोज केस धुवायचे नाहीत’ अशा ठराविक नियमांपेक्षा आपल्या केसांचा आणि टाळूचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
