How Many Times Should You Wash Your Face: चेहरा स्वच्छ आणि फ्रेश ठेवण्यासाठी फेसवॉश करणे ही रोजच्या स्किनकेअर रुटीनमधील महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र ‘जितक्या वेळा फेसवॉश, तितकी त्वचा चांगली’ हा समज चुकीचा ठरू शकतो. चेहरा वारंवार धुतल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होऊन ड्रायनेस, लालसरपणा आणि पिंपल्ससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फेसवॉश करण्याची योग्य पद्धत आणि वारंवारता जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दिवसातून किती वेळा फेसवॉश करावा?
डॉ. आंचल यांच्या मते, दिवसातून साधारणपणे दोन वेळा फेसवॉश करणे पुरेसे असते ते म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी. सकाळी फेसवॉश केल्याने रात्रीच्या वेळी त्वचेवर जमा झालेले तेल, घाम आणि इतर अवशेष स्वच्छ करण्यास मदत होते. तर रात्री चेहरा धुतल्याने दिवसभरातील धूळ-माती, प्रदूषण, अतिरिक्त तेल आणि मेकअपचे अवशेष काढून टाकता येतात.
वारंवार फेसवॉश केल्यास काय होऊ शकते?
चेहरा दिवसातून अनेकदा धुण्याची सवय असल्यास त्वचेच्या नैसर्गिक संरक्षणात्मक थरावर परिणाम होऊ शकतो.
ओव्हर-क्लिंजिंग: वारंवार फेसवॉश केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि ताणलेली वाटू शकते.
लालसरपणा आणि जळजळ: सतत चेहरा धुतल्यामुळे काही जणांच्या त्वचेवर इरिटेशन, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.
पिंपल्स वाढण्याची शक्यता: त्वचा खूप कोरडी झाल्यास काही लोकांमध्ये त्वचा अधिक तेल तयार करू शकते. त्यामुळे पिंपल्स किंवा ब्रेकआउट्सची समस्या वाढू शकते.
तुमच्या स्किन टाइपनुसार फेसवॉश निवडा
फेसवॉश निवडताना केवळ ब्रँड किंवा जाहिरात पाहण्याऐवजी आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे, हे लक्षात घ्या.
ऑयली स्किन: हलका जेल-बेस्ड किंवा नॉन-कॉमेडोजेनिक फेसवॉश उपयोगी ठरू शकतो.
ड्राय स्किन: मॉइश्चरायझिंग किंवा क्रीम-बेस्ड माइल्ड क्लिंझर निवडणे योग्य ठरू शकते.
संवेदनशील त्वचा: तीव्र सुगंध किंवा हार्श क्लिंझिंग घटक असलेली उत्पादने टाळून सौम्य क्लिंझर वापरणे चांगले.
‘नॅचरल’ हा शब्द दिसतो म्हणून प्रत्येक उत्पादन प्रत्येक त्वचेसाठी योग्य असेलच असे नाही. उत्पादनातील घटक आणि तुमच्या त्वचेची प्रतिक्रिया लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
फेसवॉश करताना ‘या’ चुका टाळा
चेहऱ्यावर फेसवॉश लावताना जोरात घासू नका. हलक्या हाताने काही सेकंद मसाज करून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा पुसताना टॉवेलने घासण्याऐवजी हलक्या हाताने कोरडा करा. त्यानंतर त्वचेला अनुरूप मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. व्यायाम किंवा जास्त घाम आल्यानंतर चेहरा स्वच्छ करणे गरजेचे वाटत असल्यास परिस्थितीनुसार चेहरा धुवा; मात्र प्रत्येक काही तासांनी फेसवॉश करण्याची सवय लावून घेऊ नका. स्वच्छ त्वचेसाठी जास्त फेसवॉश नव्हे तर योग्य फेसवॉश महत्त्वाचा आहे. तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल, जळजळ होत असेल किंवा पिंपल्स वाढत असतील, तर स्किनकेअर रुटीनचा आढावा घेणे आणि गरज असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
