Walnut Health Benefits : अक्रोड हे सुक्या मेव्यातील एक महत्वाचा घटक आहे. मेंदूच्या आकाराचा हा सुकामेवा आरोग्यासाठी अनेक पटीने फायदेशीर आहे. त्यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि खनिजे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण देतात. त्यामुळे अनेकजण रोज अक्रोडचे सेवन करतात.

परंतु कोणत्याही पदार्थाचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा त्याचे सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केले जाते.आपल्या रोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्यास तुमचे एकूण आरोग्य सुधारू शकते. पण दररोज किती अक्रोड खावेत, त्याचे फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊ…

तुम्ही दररोज किती अक्रोड खावेत?

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञ दररोज १ ते २ अक्रोड (सुमारे २८-३० ग्रॅम) खाण्याची शिफारस करतात. लहान मुले दररोज एक अख्खा अक्रोड खाऊ शकतात.

अक्रोड खाण्याचे फायदे

१) स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवते. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मज्जासंस्थेच्या विकारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

२) हृदयाचे आरोग्य सुधारते

अक्रोडामध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ॲसिड वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते, त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.

३) वजन नियंत्रण राहते

फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे, जेवणानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे अति खाणे टाळले जाते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

४) हाडे मजबूत होतात

यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात, जे हाडांची घनता वाढवतात.

५) चांगली झोप लागते

अक्रोडमध्ये मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो, जो तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करतो.

अक्रोड खाण्याची योग्य पद्धत:

अक्रोड भिजवून खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. रोज २ अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा. भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ॲसिडची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीराला ते पचवणे आणि त्यातील पोषक तत्वे शोषून घेणे सोपे जाते.

तुम्ही ते बारीक करून नाश्त्यात, ओट्स, फ्रुट सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालू शकता. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा शरीरात अतिरिक्त उष्णता असेल, तर सुके अक्रोड न भिजवता जास्त प्रमाणात खाऊ नका.