How Much Exercise Need As Per Age: व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल सर्व वयोगटातील लोकांनी केलीच पाहिजे. विज्ञानानुसार सर्व वयोगटातील लोकांसाठी एक विशिष्ट वेळ मर्यादा ठरवून दिली आहे, त्यापेक्षा जास्त हालचाल शरीरासाठी हानिकारक असू शकते. काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदालाही जास्त व्यायामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यावर त्याने सांगितले की, जास्त शारीरिक हालचाल किंवा अति व्यायामामुळे तो थकून गेला आणि बेशुद्ध पडला. तेव्हा आपण जाणून घेऊ की कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती व्यायाम पुरेसा आहे. तसंच शारीरिक हालचालींसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दलही जाणून घेऊ…
लहान मुले ते तरूण (वय ५ ते १७ वर्षे)
या वयोगटातील मुले आणि तरूणांनी आठवड्यातून किमान ३ दिवस किमान ६० मिनिटे मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली कराव्यात. यामध्ये एरोबिक व्यायाम, स्नायू आणि हाडे मजबूत करणारे व्यायाम प्रकार यांचा समावेश आहे.
तरूण आणि त्याहून अधिक वय असलेले (वय १८ ते ६४ वर्षे)
तरूण तसंच त्याहून अधिक वय असलेल्या लोकांनी आठवड्यातून किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम किंवा ७५ ते १५० मिनिटे तीव्र एरोबिक व्यायाम करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. स्नायूंना बळकटी देण्यासाठी आठवड्यातून दोनदा वजन प्रशिक्षण दिले पाहिजे.
ज्येष्ठ नागरिक
साधारण ६५ वर्षांवरील लोकांना किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. स्नायूंचे वजन राखण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा वजन प्रशिक्षण देखील घ्यावे.
गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिला
या महिलांना दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम तीव्रतेच्या एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये स्नायू बळकट करण्याच्या हालचालींचा देखील समावेश असतो.
व्यायाम करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील टीचर्स कॉलेजमधील व्यायाम तज्ज्ञ सांगतात की, ज्यांनी यापूर्वी कधीही व्यायाम केला नाही किंवा फक्त त्याबद्दल विचार करूनच घाबरतात. ते स्ट्रेचिंग आणि काही प्रमाणात चालणे यासारख्या हालचालींपासून सुरूवात करू शकतात. जर तुम्हाला ताकद वाढवायची असेल तर कॅलिस्थेनिक्स, वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स बँड वर्कआउट्स वापरून पहा.
दिवसभरातील एखादी वेळ निश्चित करा. त्या निश्चित झाल्या की वेळ आणि तीव्रता वाढवू शकता असा सल्ला तज्ज्ञ देतात.
