Salt For Heart Health : मीठ हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय अन्नाला चव येत नाही; परंतु, जर तुमच्या खाण्यापिण्यात त्याचे प्रमाण वाढले, तर हीच चवदार गोष्ट आरोग्यासाठी मोठ्या समस्येचे कारण बनू शकते. रोजच्या जेवणात आपण जे मीठ वापरतो, त्याशिवाय मिठाचा एक मोठा भाग पॅक केलेल्या विविध पदार्थांमधूनही आपल्या शरीरात जातो. पॅक केलेले स्नॅक्स, प्रोसेस्ड फूड आणि इतर तयार पदार्थांद्वारे शरीरात मोठ्या प्रमाणावर सोडियम पोहोचत असते. दीर्घकाळ जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो, ज्याचा वाईट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.

सोडियम शरीरातील द्रवांचे (फ्लुइड्स) संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते; पण प्रमाणापेक्षा जास्त सोडियम शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. याच कारणामुळे तज्ज्ञ आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, सामान्यतः आपल्या रोजच्या आहारात सोडियमचे प्रमाण २,३०० मिग्रॅ पेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा (हाय बीपी) त्रास आहे, त्यांनी मिठाच्या बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे.

पॅक केलेल्या पदार्थांमधील सोडियमचे प्रमाण

सोडियम फक्त आपण घरात बनवलेल्या जेवणातूनच शरीरात जात नाही. चिप्स, फरसाण/नमकीन, इन्स्टंट नूडल्स, सॉस, सुप्स, पॅकेज्ड स्नॅक्स आणि अनेक प्रोसेस्ड फूडमध्येही मीठ किंवा सोडियमचे प्रमाण खूप जास्त असू शकते. त्यामुळे बाजारातून कोणतीही पॅक केलेली वस्तू खरेदी करताना तिच्या लेबलवर दिलेले सोडियमचे प्रमाण तपासणे अत्यंत गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये छोटे बदल करूनही रोजच्या सोडियमचे एकूण प्रमाण कमी केले जाऊ शकते.

पोटॅशियमयुक्त पदार्थ खा

शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आहारात पोटॅशियमने समृद्ध असलेले खाद्यपदार्थ समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. केळी, पालक, बटाटे, टरबूज आणि बीट हे पोटॅशियमचे काही चांगले स्रोत आहेत. पोटॅशियम शरीरावर होणारा सोडियमचा प्रभाव कमी करण्यास आणि रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते.

त्यामुळे जर तुमच्या आहारात खारे आणि प्रोसेस्ड पदार्थांचे प्रमाण जास्त असेल, तर फक्त मीठ कमी करणेच नाही, तर ताजे आणि पोटॅशियमयुक्त पदार्थ वाढवणेही गरजेचे आहे. मात्र, मूत्रपिंडाचा (किडनीचा) आजार असलेल्या लोकांनी पोटॅशियमचे प्रमाण वाढविण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

पाणी पिण्यात आळस करू नका

शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण राखणे खूप महत्त्वाचे आहे. सोडियमचा काही भाग लघवीद्वारे शरीराबाहेर पडतो आणि त्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. भरपूर पाणी पिण्यासोबतच मीठ आणि जास्त सोडियम असलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचे ध्येय ठेवा.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बाहेरचे जेवण, पॅकेज्ड स्नॅक्स व प्रोसेस्ड फूड वारंवार खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वेगाने वाढू शकते. त्याऐवजी ताजी फळे, भाज्या, डाळी व कडधान्ये यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा आहारात समावेश करा. तसेच, वेळोवेळी रक्तदाब आणि हृदयाची तपासणी करत राहा, जेणेकरून आरोग्याची त्या त्या वेळची स्थिती वेळेवर समजू शकेल.