How Much Toothpaste Should Use: सकाळी आपण सर्वात आधी दात घासतो. आपण बाथरूममध्ये जातो, ब्रश उचलतो आणि भरपूर प्रमाणात टूथपेस्ट लावतो. आपण अनेकदा विचार न करता हे करतो कारण टीव्ही आणि मोबाईल फोनवरील टूथपेस्टच्या जाहिरातींमध्ये अनेकदा टूथपेस्टने भरलेले ब्रश दाखवले जातात. यामुळे आपल्याला असे वाटते की जितकी जास्त पेस्ट तितकी स्वच्छता चांगली आणि फायदे जास्त. पण असं खरंच आहे का? जास्त टूथपेस्ट लावल्याने तुमचे दात खरोखर स्वच्छ होतात का की ते हानिकारक असू शकते? तर मग जाणून घेऊ ब्रश करण्यासाठी टूथपेस्टचे नेमके योग्य प्रमाण काय?
योग्य ब्रशिंसाठी किती टूथपेस्टची आवश्यकता असते?
डॉ. सलीम झैदी यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, योग्य ब्रशिंसाठी जास्त टूथपेस्टची आवश्यकता नाही. तुमचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट पुरेशी आहे. हे प्रमाण तुमचे दात पूर्णपणे स्वच्छ करते आणि तुमचे तोंड ताजे ठेवते. प्रत्यक्षात दातांची स्वच्छता टूथपेस्टच्या प्रमाणात अवलंबून नाही, तर ब्रशिंगच्या योग्य पद्धतीवर आणि वेळेवर अवलंबून असते.
जास्त टूथपेस्ट लावल्याने कोणते नुकसान होऊ शकते?
लोकांना अनकदा असे वाटते की, जास्त टूथपेस्ट लावल्याने दात चमकतील, मात्र सत्य याउलट आहे. जेव्हा तुम्ही प्रशवर आवश्यकतेपेक्षा जास्त टूथपेस्ट लावता तेव्हा तोंडात जास्त फेस तयार होतो. जास्त फेस आल्याने दोन समस्या उद्भवतात. पहिली म्हणजे फेसामुळे तुम्ही लवकर ब्रश करायला सुरूवात करता आणि दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. दुसरे म्हणजे जास्त फेस आल्याने ब्रशचे ब्रिसल्स दात आणि हिरड्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचू शकत नाहीत. काही लोकांना जास्त टूथपेस्टमुळे हिरड्यांमध्ये जळजळ, संवेदनशीलता दातांच्या वरच्या थराला नुकसान होऊ शकते.
जाहिरातींमध्ये ब्रश पेस्टने भरलेले का दाखवले जातात?
तुमच्या लक्षात आले असेल की, टूथपेस्टच्या जाहिरातींमध्ये अनेकदा ब्रशवर टूथपेस्टची लांब रांग दिसते. यामागील कारण दंत आरोग्य नाही तर मार्केटिंग आहे. लोकांनी भरपूर टूथपेस्ट वापरायची असते जेणेकरून ती लवकर संपेल आणि त्यांना नवीन पॅक खरेदी करत राहावे लागतील. म्हणूनच जाहिरातींमध्ये अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त टूथपेस्ट दाखवले जातात. तसंच डॉक्टरांचा सल्ला जाहिरातींमध्ये सांगितल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.
मुलांसाठी किती टूथपेस्ट योग्य आहे?
मुलांबाबत आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुले अनेकदा ब्रश करताना टूथपेस्ट गिळतात. ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तज्ज्ञांच्या मते, तांदळाच्या दाण्याएवढी थोडीशी टूथपेस्ट मुलांसाठी पुरेशी आहे. यामुळे त्यांचे दात स्वच्छ राहतात आणि टूथपेस्ट गिळण्याचा धोका कमी होतो. पालकांनी त्यांच्या मुलांवर ब्रश करताना लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांना योग्य प्रमाणात टूथपेस्ट कसे वापरावे हे शिकवले पाहिजे.
ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती?
तोंडाच्या उत्तम आरोग्यासाठी, केवळ टूथपेस्ट वापरण्याचे प्रमाणच नाही तर ब्रश करण्याची पद्धतदेखील महत्त्वाची आहे. निरोगी दात राखण्यासाठी दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. दात आणि हिरड्या दोन्ही स्वच्छ करण्यासाठी सौम्य, गोलाकार हालचाली वापरा. जास्त जोरात ब्रश केल्याने दात आणि हिरड्या दोन्ही खराब होऊ शकतात.
तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दात घासता तेव्हा जाहिरातींवर आधारित ब्रश भरण्याची चूक करू नका. योग्य प्रमाणात, योग्य पद्धत आणि नियमित ब्रशिंग हे निरोगी दात आणि हास्याचे खरे रहस्य आहे.

