How much water drink in day Age wise: हायड्रेटेड राहणं म्हणजे शरीरात पुरेसं पाणी असणं, हे ऊर्जा, पचन आणि एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण शरीराला किती पाणी लागेल हे तुमचं वय, जीवनशैली आणि हवामान यावर अवलंबून असतं. खूप कमी पाणी प्यायलात तर शरीर डिहायड्रेट होतं, आणि खूप जास्त पाणी प्यायलात तरी शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं हे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

पाणी हे मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी आणि नीट काम करण्यासाठी पाणी आवश्यक असतं. मानवी शरीरात सुमारे ६० टक्के भाग पाण्याचा असतो. पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं, शरीरात पोषक तत्त्वं पोहोचवायला मदत करतं, घाण व विषारी पदार्थ बाहेर टाकतं आणि अवयवांना योग्यरीत्या काम करण्यास मदत करतं. म्हणूनच शरीरात पुरेसं पाणी असणं खूप गरजेचं आहे. यामुळे ऊर्जा टिकून राहते, पचन व्यवस्थित होतं, मेंदू चांगलं काम करतो आणि त्वचा देखील निरोगी राहते. पण प्रत्येक व्यक्तीला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण सारखं नसतं. वय, शरीराचं वजन, शारीरिक हालचाल, हवामान आणि एकूण आरोग्य – या सगळ्या गोष्टींवर रोज किती पाणी प्यावं हे ठरतं.

दिल्लीतील इंटरनल मेडिसिन आणि लाइफस्टाइल हेल्थ स्पेशालिस्ट डॉ. अर्जुन रावत यांच्या मते, उदाहरणार्थ लहान मुलांना मोठ्यांपेक्षा कमी पाणी लागते. पण किशोरवयीन मुलं आणि जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांना घामामुळे शरीरातून पाणी कमी होत असल्याने जास्त पाणी पिण्याची गरज असते. तसंच वयस्कर लोकांनीही पाणी पिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं, कारण वय वाढल्यावर तहान लागण्याची भावना कमी होत जाते.

उलट खूप जास्त पाणी पिणंही शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त पाणी प्यायल्यानं रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होतं. या अवस्थेला वॉटर इंटॉक्सिकेशन किंवा हायपोनेट्रेमिया असं म्हणतात. म्हणूनच आपल्या शरीराला वेगवेगळ्या वयात आणि जीवनशैलीनुसार नेमकं किती पाणी लागते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकण्याची प्रक्रिया आणि एकूण आरोग्य यामध्ये योग्य संतुलन राखता येतं.

वयानुसार किती पाणी प्यावं? (How much glass water to drink in a day Age wise)

मुलं (४ ते १२ वर्षे)

या वयातील मुलांनी रोज साधारण ५ ते ७ ग्लास पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरात पाणी टिकून राहतं. पाणी मुलांच्या वाढीस, मेंदूच्या विकासाला आणि शाळेत लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतं. जी मुलं बाहेर खेळतात किंवा जास्त धावपळ करतात, त्यांना घामामुळे अजून पाणी लागऊ शकतं. पुरेसं पाणी पिणं त्यांच्या सध्याच्या आणि भविष्यातील ऊर्जेसाठी महत्त्वाचं असतं.

किशोरवयीन (१३ ते १८ वर्षे)

या वयातील मुलांनी साधारण ७ ते ९ ग्लास पाणी रोज प्यायला हवं. किशोरवयात शरीरात झपाट्याने वाढ आणि हार्मोन्समध्ये बदल होतात. तसेच खेळ, व्यायाम यामुळे घाम येऊन शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं असतं. यामुळे लक्ष केंद्रित करणे, ताकद आणि शारीरिक क्षमता चांगली राहते.

प्रौढ (१९ ते ६० वर्षे)

शरीर निरोगी ठेवण्यासाठी बहुतेक प्रौढ व्यक्तींनी रोज साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. पुरेसं पाणी पिण्यामुळे पचन आणि मेटाबॉलिझम नीट राहण्यास मदत होते. तसेच शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठीही पाणी महत्त्वाचं असतं. जे लोक नियमित व्यायाम करतात किंवा गरम हवामानात राहतात, त्यांना अजून जास्त पाणी पिण्याची गरज पडू शकते. नियमित पाणी पिण्यामुळे किडनी आणि त्वचेच्या आरोग्यालाही फायदा होतो.

ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील)

वय वाढल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी रोज साधारण ७ ते ८ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. पुरेसं पाणी पिणं सांध्यांच्या आरोग्यासाठी, पचनासाठी आणि रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. वय वाढल्यावर तहान लागण्याची भावना कमी होत जाते, त्यामुळे अनेकदा पाणी पिणं विसरलं जातं. म्हणूनच नियमितपणे पाणी पिण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

पाणी खूप जास्त झाल्यास काय होते

एकाच वेळी ४ ते ५ लिटरपेक्षा जास्त पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त पाणी प्यायल्यानं रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होतं आणि शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकतं. या अवस्थेला ओव्हरहायड्रेशन किंवा वॉटर इंटॉक्सिकेशन असं म्हणतात. यामुळे मेंदूच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. डोकेदुखी, मळमळ आणि गोंधळल्यासारखं वाटणं ही त्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. गंभीर परिस्थितीत यामुळे मोठे आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात.

डॉ. रावत यांच्या मते, निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी शरीराला तहान लागल्यावर पाणी पिणं आणि दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय ठेवणं हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.