सतत रात्रपाळीत काम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयाशी संबंधित समस्यादेखील उदभवू शकतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनाद्वारे पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी रात्रपाळी केलेल्या स्त्रियांमध्ये हृदयरोगाशी संबंधित समस्येमुळे मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून आले. तर पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ रात्रपाळी केलेल्या स्त्रिया फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. या पाहाणीत महिन्याला कमितकमी तीन रात्रपाळी करणाऱ्या स्त्रियांचा समावेश करण्यात आला होता. हार्वड मेडिकल स्कुलच्या सहायक प्राध्यापिका इवा शॅर्नहैमर म्हणाल्या, झोप, दैनंदिन जीवनक्रिया आणि हृदयाचे स्वास्थ्य आणि कर्करोगाच्या ट्युमरच्या वाढीला थांबविण्यासाठीचे महत्वाचे कार्य करतात. जगभरात रात्रपाळीत काम करणाऱ्यांची संख्या जोमाने वाढत असल्याने याबाबत करण्यात आलेली अभ्यासपूर्ण पाहणी जगभरातील मोठ्या समूहासाठी करण्यात आलेला अभ्यास आहे. या पाहाणीदरम्यान अमेरिकेतील परिचारीकांची माहिती ठेवणारी संस्था नर्सेज हेल्थ स्टडी द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या गेल्या २२ वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. या संस्थेकडे जवळजवळ ७५ हजार नोंदणीकृत परिचारीकांची माहिती साठवलेली आहे. सहा ते पंधरा वर्षांपर्यंत आळीपाळीने रात्रपाळीत काम करणाऱ्या परिचारीकांचा मृत्यूदर ११ टक्के अधिक असल्याचे या पाहणीत समोर आले. यात हृदयाच्या विकारांमुळे झालेला मृत्यूदर हा १९ टक्क्यांनी जास्त होता. १५ वर्षांपेक्षा अधिक काळ रात्रपाळीत काम केलेल्या परिचारीकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा धोका २५ टक्क्यांहून अधिक आढळून आला. या अभ्यास पाहणीचा अहवाल ‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिवेंटिव्ह मेडिसिन’च्या ताज्या अंकात प्रकाशित झाला आहे.

गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे