How often Should Couples Have Sex: शारीरिक संबंध हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा अत्यंत खास आणि संवेदनशील भाग मानला जातो. “नेमका किती वेळा संबंध ठेवणं सामान्य आहे?” किंवा “आपलं जीवन इतरांपेक्षा वेगळं आहे का?” अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत असतात; मात्र त्याचे ठोस उत्तर कुठेच मिळत नाही. कारण- शारीरिक संबंधांबाबत ‘नियमांचे’ कोणतेही पुस्तक नसते.
मात्र, अलीकडेच एका संशोधनाने या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या अहवालामुळे अनेकांच्या मनातील कुतूहल वाढले आहे; पण त्याच वेळी काही महत्त्वाच्या गोष्टीही समोर आल्या आहेत.
संशोधन नेमकं काय सांगतं?
किन्से इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन सेक्स, रिप्रॉडक्शन अँड जेंडर या संस्थेने विविध वयोगटांतील लोकांच्या शारीरिक संबंधांच्या वारंवारतेचा अभ्यास केला. या अभ्यासात वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्ती एका वर्षात सरासरी किती वेळा संबंध ठेवतात, याचा आढावा घेण्यात आला.
१८ ते २९ वयोगट – सर्वाधिक वारंवारता
संशोधनानुसार, १८ ते २९ वयोगटातील व्यक्ती वर्षभरात सरासरी सुमारे ११२ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. या वयोगटात ऊर्जा, आकर्षण आणि नात्यातील उत्साह अधिक असल्याने ही संख्या जास्त असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
३० ते ३९ वयोगट – जबाबदाऱ्यांचा प्रभाव
३० ते ३९ वयोगटात ही वारंवारता कमी होऊन वर्षाला सरासरी ८६ वेळा शारीरिक संबंध घडतो. या टप्प्यावर करिअर, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या वाढू लागतात. त्यामुळे वैयक्तिक वेळ कमी पडतो आणि त्याचा परिणाम नात्यातील या घटकावरही दिसू शकतो.
४० ते ४९ वयोगट – आणखी घट
४० ते ४९ वयोगटात शारीरिक संबंध येण्याची ही संख्या आणखी कमी होऊन, वर्षाला सुमारे ६९ वेळांपर्यंत येते. वाढतं वय, आरोग्याच्या समस्या आणि जीवनशैलीतील बदल यांमुळे ही घट दिसून येते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
विवाहानंतर चित्र बदलतं?
संशोधनातील एक लक्षवेधी बाब म्हणजे विवाहानंतर या वारंवारतेत झालेली घट. सुमारे १३ टक्के विवाहित जोडपी वर्षातून फारच कमी वेळा शारीरिक संबंध ठेवतात; तर सुमारे ४५ टक्के जोडपी महिन्यात काही वेळाच या गोष्टीसाठी वेळ काढतात.
त्यामागे अनेक कारणे असू शकतात. दैनंदिन जबाबदाऱ्या, कामाचा ताण, घरगुती कामे, मुलांची काळजी आणि मानसिक थकवा. या सर्वांचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होतो.
इतर काही महत्त्वाचे निष्कर्ष
या अभ्यासात असेही दिसून आले की, सुमारे ३४ टक्के लोक आठवड्यातून दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध ठेवतात; तर केवळ सात टक्के लोक आठवड्यात चार ते पाच वेळा संबंध ठेवतात.
हे आकडे वेगवेगळ्या जीवनशैली, आरोग्य आणि नात्यांतील समजुतीनुसार बदलू शकतात.
वारंवारता का कमी होते?
तज्ज्ञांच्या मते, वयानुसार शरीरात होणारे बदल, आरोग्याच्या समस्या, तणाव, मानसिक थकवा आणि वाढत्या जबाबदाऱ्या यांमुळे शारीरिक संबंधांची वारंवारता कमी होत जाते. त्याशिवाय नात्यातील संवाद आणि भावनिक जवळीक या बाबीही या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सर्वांत महत्त्वाचं काय?
हे सर्व आकडे केवळ एक सरासरी दर्शवतात. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक नातं वेगळं असतं. त्यामुळे या आकड्यांशी स्वतःची तुलना करणे योग्य नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात समाधान, विश्वास आणि आनंद आहे का हेच खरे निकष आहेत. वारंवारतेपेक्षा नात्यातील समज, संवाद आणि परस्पर आदर अधिक महत्त्वाचा असतो.
म्हणूनच आकड्यांमध्ये अडकण्यापेक्षा नात्यातील आनंद आणि समाधान जपणं अधिक महत्त्वाचे आहे.
(Disclaimer : वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
