How Often To Change Pillow: रात्री शांत झोप मिळण्यासाठी योग्य गादीची निवड करण्यावर अनेक जण भर देतात. पण ज्या उशीवर आपण दररोज ७ ते ८ तास डोकं ठेवून झोपतो, तिच्याकडे मात्र फारसे लक्ष दिले जात नाही. अनेक लोक वर्षानुवर्षे तीच उशी वापरतात. ती नियमित धुतली जात नाही किंवा वेळेवर बदललीही जात नाही. पण हीच सवय तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
उशीमध्ये काय साचत जाते?
फिजिशियन डॉ. कुणाल सूद यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, उशी केवळ डोक्याला आधार देत नाही, तर झोपताना शरीरातून निघणारा घाम, त्वचेवरील तेल (Sebum), मृत त्वचेच्या पेशी आणि धूळकण (Dust Mites) यांचाही साठा त्यात होत जातो. हे धुळीचे कण मृत त्वचेच्या पेशींवर जगतात. त्यांच्या विष्ठेमधील कण हे घरातील अॅलर्जी निर्माण करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक मानले जातात. त्यामुळे सकाळी उठल्यावर वारंवार शिंक येणे, नाक बंद होणे किंवा डोळ्यांची खाज वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.
जुन्या उशीमुळे कोणते आरोग्याचे धोके वाढतात?
बंगळुरू येथील अंतर्गत औषधतज्ज्ञ डॉ. पल्लेटी शिव कार्तिक रेड्डी यांनी सांगितले की, जुनी उशी कालांतराने सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार करते. त्यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात.
१. अॅलर्जीचा धोका वाढतो
उशीतील धुळीचे कण श्वासावाटे शरीरात गेल्यास वर्षभर अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.
- सतत नाक बंद राहणे
- शिंकांचा त्रास
- खोकला
- डोळे लाल होणे किंवा खाज येणे
२. दम्याच्या रुग्णांसाठी अधिक धोकादायक
जुन्या उशीतील धुळीचे कण दम्याचा झटका येण्याचे प्रमुख कारण ठरू शकतात. शिवाय इतरही त्रास वाढू शकतात.
छातीत जडपणा
श्वास घेताना घरघर
रात्री दम्याचे झटके
मुलांमध्ये भविष्यात दमा होण्याचा धोकाही वाढू शकतो.
३. त्वचेच्या समस्या वाढू शकतात
घाम, तेल आणि जीवाणू उशीमध्ये साचल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होतात. यामुळे-
वारंवार मुरुम येणे
त्वचेवर पुरळ
एक्झिमा वाढणे
४. झोपेची गुणवत्ता घसरते
नाक बंद होणे, डोळ्यांची खाज आणि श्वास घेण्यास होणारा त्रास यामुळे रात्री वारंवार जाग येते. परिणामी गाढ झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.
५. मान आणि खांद्याच्या वेदना
उशी कालांतराने चपटी होते. त्यामुळे डोके आणि मानेला योग्य आधार मिळत नाही. यामुळे-
- मान आखडणे
- खांद्यामध्ये वेदना
- सकाळी उठल्यावर कडकपणा जाणवणे
- उशी किती दिवसांनी बदलावी?
तज्ज्ञ काय सांगतात?
- उशीचे कव्हर दर आठवड्याला धुवा.
- उशी दर ३ ते ६ महिन्यांनी स्वच्छ करा (उशीच्या प्रकारानुसार).
- प्रत्येक १ ते २ वर्षांनी उशी बदलणे योग्य ठरते.
- उशीचा आकार बदलला असेल किंवा ती चपटी झाली असेल, तर नवीन उशी घेण्यास विलंब करू नका.
- चांगली उशी निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा
- मानेला योग्य आधार देणारी उशी निवडा.
- धूळकणांपासून संरक्षण करणारे कव्हर वापरा.
- धुण्यास सोपी आणि दर्जेदार साहित्याची उशी घ्या.
- उशी पूर्णपणे कोरडी ठेवण्याची सवय लावा.
आरामदायी आणि निरोगी झोपेसाठी केवळ चांगली गादी पुरेशी नसते. स्वच्छ, योग्य आकाराची आणि वेळेवर बदललेली उशीही तितकीच महत्त्वाची असते. जुनी उशी अॅलर्जी, दमा, त्वचेच्या समस्या आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. त्यामुळे जर तुमची उशी अनेक वर्षांपासून बदललेली नसेल, तर आता तिच्याकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे.
