How Often Should You Have Sex Based on Your Age: अधिक घट्ट करण्यामध्ये संवाद, विश्वास आणि भावनिक जवळीक जितकी महत्त्वाची असते, तितकीच शारीरिक जवळीकही अनेक जोडप्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, ‘एका जोडप्याने किती वेळा शारीरिक संबंध ठेवावेत’ या प्रश्नाचे ठरलेले असे एकच उत्तर देता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरज वेगळी असते. त्यामुळे या विषयावर अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील Kinsey Institute for Research in Sex, Reproduction and Gender या संस्थेने केलेल्या एका संशोधनाने विविध वयोगटांतील लोक वर्षभरात सरासरी किती वेळा शारीरिक संबंध ठेवतात, याबाबत काही महत्त्वाची आकडेवारी समोर आणली आहे. मात्र, या संशोधनाचा अर्थ असा नाही की, प्रत्येकाने याच प्रमाणात शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत. हे केवळ सरासरी आकडे असून, प्रत्येक जोडप्यातील भावनाबंध वेगवेगळे असतात हे लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे.

वयानुसार किती वेळा शारीरिक संबंध?

संशोधनातील निष्कर्षांनुसार, १८ ते २९ वर्षं वयोगटातील व्यक्ती वर्षभरात सरासरी ११२ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. या वयोगटात शारीरिक ऊर्जा, आकर्षण आणि नात्यातील उत्साह अधिक असल्याने ही संख्या तुलनेने जास्त असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

३० ते ३९ वर्षे वयोगटात ही संख्या कमी होऊन, ती ८६ वेळा प्रतिवर्ष इतकी असल्याचे आढळले. त्यानंतर ४० ते ४९ वर्षे वयोगटात ही सरासरी आणखी कमी होऊन, ६९ वेळा प्रतिवर्ष इतकी असल्याचे संशोधनात दिसून आले.

विवाहित जोडप्यांबाबत काय सांगते आकडेवारी?

या संशोधनातील आणखी एक निरीक्षण लक्षवेधी ठरले. संशोधनानुसार, सुमारे १३ टक्के विवाहित जोडपी वर्षभरात फारच कमी वेळा शारीरिक संबंध ठेवतात; तर सुमारे ४५ टक्के जोडपी महिन्यात केवळ काही वेळाच शारीरिक संबंध ठेवतात.

ही आकडेवारी पाहून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यामागे अनेक व्यावहारिक कारणे असू शकतात.

वयानुसार वारंवारता का कमी होते?

संशोधकांच्या मते, विवाहानंतर जबाबदाऱ्या वाढणे, कामाचा ताण, घरातील कामे, मुलांची काळजी, मानसिक तणाव व वेळेचा अभाव यांमुळे शारीरिक संबंधांची वारंवारता कमी होऊ शकते. त्याशिवाय वय वाढत असताना काही दीर्घकालीन आजार, हार्मोन्समधील बदल किंवा आरोग्याशी संबंधित समस्या यांचाही परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.

आणखी काय सांगते संशोधन?

संशोधनात सहभागी झालेल्या ३४ टक्के लोकांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध ठेवत असल्याचे सांगितले; तर सात टक्के सहभागी व्यक्ती आठवड्यातून चार ते पाच वेळा शारीरिक संबंध ठेवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, आकडेवारीशी स्वतःची तुलना करू नका

तज्ज्ञ याबाबत एक महत्त्वाचा सल्ला देतात. अशा संशोधनातील आकडेवारी वाचल्यानंतर स्वतःच्या वैवाहिक किंवा वैयक्तिक आयुष्याची तुलना इतरांशी करू नये. कारण- शारीरिक संबंधांची वारंवारता ही कोणत्याही नात्याच्या यशाचे एकमेव मोजमाप नसते.

जर दोन्ही जोडीदार परस्पर संमतीने, समाधानी आणि आनंदी असतील, तर त्यांच्यासाठी योग्य असलेली वारंवारताच सर्वांत योग्य मानली जाते. त्या दृष्टीने नातेसंबंधांमध्ये कायम सलोखा राहावा यासाठी संवाद, आदर, विश्वास आणि भावनिकदृष्ट्याही परस्परांशी जुळवून घेणे हे कोणत्याही आकडेवारीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा संदेश

या संशोधनातील निष्कर्ष हे सरासरी आकडे दर्शवतात; कोणताही वैद्यकीय नियम सांगत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोघांच्याही बाबतीत आरोग्य, वय, जीवनशैली आणि परस्पर संमती या घटकांची जाणीव ठेवून योग्य तो निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे आहे. शारीरिक संबंधांबाबत कोणतीही अडचण, वेदना किंवा चिंता वाटत असल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी स्त्रीरोगतज्ज्ञ, मूत्ररोगतज्ज्ञ, लैंगिक आरोग्य तज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. अशा विषयांवर वैज्ञानिक माहितीच्या आधारावर जागरूकता वाढवणे, हाच अशा संशोधनांचा मुख्य उद्देश आहे.