Poop Frequency: अनेकांना दररोज शौचाला न गेल्यास बद्धकोष्ठतेची समस्या असल्याचं वाटतं. मात्र, तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीची पचनक्रिया वेगळी असते. त्यामुळे शौचाला जाण्याची ठरलेली संख्या नसते. महत्त्वाचं म्हणजे शौच सहज व्हायला हवं आणि त्यावेळी कोणताही त्रास होऊ नये.
किती वेळा शौचाला जाणं सामान्य मानलं जातं?
डॉक्टरांच्या मते, एखादी व्यक्ती दिवसातून तीन वेळा शौचाला जात असेल किंवा दोन-तीन दिवसांत एकदा जात असेल, तरी ते सामान्य असू शकतं. प्रत्येकाची शरीररचना आणि पचनक्रिया वेगळी असल्याने सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही.
चांगल्या पचनसंस्थेची लक्षणं कोणती?
फक्त शौचाला किती वेळा जाता यापेक्षा ते कसं होतं हे अधिक महत्त्वाचं आहे. शौच मऊ असावं, सहज व्हावं, जास्त जोर लावावा लागू नये आणि झाल्यानंतर पोट पूर्ण साफ झाल्यासारखं वाटलं पाहिजे. अशा सवयी चांगल्या आतड्यांच्या आरोग्याचं लक्षण मानल्या जातात.
कोणत्या कारणांमुळे बदल होऊ शकतो?
आहारात अचानक बदल होणं, पाणी कमी पिणं, व्यायामाचा अभाव, तणाव, काही औषधं किंवा इतर आरोग्य समस्या यामुळे शौचाच्या सवयी बदलू शकतात. त्यामुळे काही दिवस बदल जाणवणं नेहमीच गंभीर नसतं.
ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल होऊन तो अनेक दिवस कायम राहिल्यास दुर्लक्ष करू नका. वारंवार बद्धकोष्ठता, सतत जुलाब, पोटदुखी, पोट फुगणं, शौचात रक्त दिसणं किंवा इतर त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं?
तज्ज्ञांच्या मते, रोज पुरेसं पाणी पिणं, फायबरयुक्त आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि विनाकारण जुलाबाची किंवा बद्धकोष्ठतेची औषधं घेणं टाळणं फायदेशीर ठरतं. चांगल्या जीवनशैलीमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
