Daily Soap Use For Bathing: आंघोळ हा आपल्या रोजच्या दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळा किंवा दमट हवामानात घामामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदा तरी आंघोळ करावीशी वाटते. व्यायाम केल्यानंतर, घराची साफसफाई केल्यानंतर किंवा बराच वेळ उन्हात राहिल्यानंतर तर आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. पण एखाद्या दिवशी तुम्ही दिवसभर घरातच असाल, फारसा घामही आला नसेल, तर त्या दिवशी संपूर्ण शरीराला साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं आहे का? याबाबत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी खेत्रपाल यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किंवा आठवड्यात किती वेळा आंघोळ करावी याचा एकच नियम नाही. तुमची जीवनशैली, हवामान, शरीराला येणारा घाम आणि त्वचेचा प्रकार यानुसार आंघोळीची गरज बदलू शकते.
रोज आंघोळ करा, पण रोज संपूर्ण शरीराला साबण लावणं गरजेचं नाही?
सामान्य परिस्थितीत दिवसातून एकदा आंघोळ करणं स्वच्छता राखण्यासाठी पुरेसं ठरू शकतं. मात्र, प्रत्येक वेळी संपूर्ण शरीराला साबणाने घासण्याची गरज नसते. जर तुम्हाला जास्त घाम येत नसेल, धूळ-माती किंवा घाणीच्या संपर्कात आला नसाल आणि त्वचेची विशेष समस्या नसेल, तर दररोज संपूर्ण शरीरावर साबण वापरण्याची गरज नाही. चेहरा, काख आणि प्रायव्हेट पार्ट्स या भागांची स्वच्छता नियमित ठेवणं महत्त्वाचं आहे. शरीराच्या इतर भागांवर दररोज कडक साबण वापरल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होऊ शकतो.
‘या’ लोकांनी मात्र रोज आंघोळ करणं टाळू नये
तुम्ही दररोज व्यायाम करत असाल, भरपूर घाम येत असेल किंवा कामाच्या ठिकाणी धूळ-मातीच्या संपर्कात येत असाल, तर रोज आंघोळ करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. उष्ण आणि दमट हवामानातही शरीरावर घाम आणि तेल अधिक प्रमाणात जमा होऊ शकतं. त्यामुळे आंघोळ केल्याने घाम, घाण आणि त्वचेवरील काही सूक्ष्मजीव दूर करण्यास मदत होते.
काख, पाय आणि जांघेचा भाग याठिकाणी घाम जास्त जमा होऊ शकतो. हे भाग बराच वेळ उबदार आणि ओलसर राहिल्यास दुर्गंधीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे या भागांची साबण आणि पाण्याने स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे.
जास्त साबण = जास्त स्वच्छता? असा गैरसमज करू नका
अनेकांना वाटतं की शरीरावर जास्त साबण लावला तर त्वचा अधिक स्वच्छ राहते. मात्र, असं नेहमीच होत नाही. वारंवार साबणाचा वापर किंवा खूप वेळ आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होऊ शकतो. परिणामी त्वचा कोरडी, ताणलेली किंवा खाज सुटणारी होऊ शकते. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा. आंघोळीनंतर त्वचा सतत कोरडी पडत असेल, खाज येत असेल, जळजळ होत असेल किंवा त्वचेवर पापुद्रे निघत असतील, तर आपल्या आंघोळीच्या सवयी आणि वापरत असलेल्या साबणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
आंघोळ करताना ‘या’ छोट्या गोष्टी लक्षात ठेवा
त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आंघोळ खूप वेळ लांबवण्याची गरज नाही. शक्यतो सुमारे पाच मिनिटांत आंघोळ आटोपण्याचा प्रयत्न करा. दररोज संपूर्ण शरीराला साबण लावण्याऐवजी गरजेनुसार त्याचा वापर करा. चेहरा, काख आणि जांघेचा भाग नियमित स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. शरीरावर घाम, माती किंवा घाण असेल तर त्या भागांवर साबणाचा वापर करू शकता. आंघोळीनंतर टॉवेलने त्वचा जोरात घासू नका. हलक्या हाताने टिपून शरीर कोरडं करा. त्वचा कोरडी वाटत असल्यास सुगंधरहित मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होऊ शकते.
मग आठवड्यात किती दिवस साबणाने आंघोळ करावी?
याचं एकच उत्तर सर्वांसाठी लागू होत नाही. तुमची जीवनशैली, हवामान, घाम येण्याचं प्रमाण आणि त्वचेची अवस्था यानुसार साबणाचा वापर ठरतो. साधारणपणे रोज आंघोळ करणं ठीक असू शकतं; मात्र रोज संपूर्ण शरीराला साबणाने घासणं आवश्यक नाही. एखाद्या दिवशी तुम्ही घरातच असाल, घाम आला नसेल आणि शरीरावर घाण नसेल, तर साबणाचा वापर मर्यादित ठेवणं त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं.
दुसरीकडे, व्यायाम, जास्त घाम, उष्ण-दमट हवामान किंवा धूळ-मातीच्या संपर्कानंतर आंघोळ करणं आणि आवश्यक भाग साबणाने स्वच्छ करणं अधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच, आंघोळीबाबत ‘रोज साबण लावायलाच हवा’ किंवा ‘आंघोळ टाळली तरी चालते’ असा एकच नियम न ठेवता, आपल्या शरीराची आणि त्वचेची गरज ओळखून सवय ठरवणं अधिक योग्य ठरू शकतं.
