Bath Towel Washing Tips Hacks : अंघोळीनंतर अंग कोरडं करण्यासाठी टॉवेल तर प्रत्येक जण वापरतो; पण तो किती दिवसांनी धुवावा याकडे फार कमी लोकांचे लक्ष असते. अनेक जण एकच टॉवेल कित्येक आठवडे वापरत राहतात. टॉवेल वरून स्वच्छ दिसत असल्यामुळे तो धुण्याची गरज नाही असे वाटते; पण वास्तविक तसे नसते. अंघोळीनंतर टॉवेलमध्ये शरीराचा ओलावा राहतो. त्याशिवाय त्वचेवरील घाण आणि तेलही टॉवेलला लागते. जर टॉवेल व्यवस्थित वाळला नाही आणि तो सतत वापरला गेला, तर त्याला दुर्गंधी येऊ शकते. म्हणूनच टॉवेल वेळोवेळी धुणे आवश्यक आहे.
टॉवेल किती दिवसांनी धुवावा?
साधारणपणे अंघोळीचा टॉवेल तीन ते पाच वेळा वापरल्यानंतर धुवावा. जर एखादी व्यक्ती रोज अंघोळ करीत असेल आणि प्रत्येक वापरानंतर टॉवेल चांगला वाळवत असेल तरी आठवड्यातून किमान एकदा टॉवेल धुणे हा एक सोपा नियम मानला जाऊ शकतो.
पावसाळ्यात जास्त काळजी घ्या
पावसाळ्यात हवेत दमटपणा जास्त असतो. अशा वेळी टॉवेल लवकर वाळत नाही. जर टॉवेल वारंवार ओला किंवा दमट राहत असेल, तर तो लवकर धुवावा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापरल्यानंतर टॉवेल व्यवस्थित पसरवून वाळवावा, जेणेकरून त्यात ओलावा राहणार नाही.
ओला टॉवेल असाच ठेवू नका
अंघोळीनंतर टॉवेल घडी घालून किंवा बाथरूमच्या एका कोपऱ्यात तसाच टाकून ठेवू नका. तो अशा ठिकाणी पसरवून वाळत घाला, जिथे त्याला नीट हवा लागेल. त्यामुळे टॉवेल लवकर वाळेल आणि त्याला कुबट वास येण्याची शक्यता कमी होईल.
चेहऱ्याचा आणि हाताचा टॉवेल वेगळा ठेवा
चेहऱ्यासाठी वापरला जाणारा टॉवेल जास्त वेळा धुणे जास्त चांगले. हात पुसण्याचा टॉवेलही नियमितपणे बदलत राहा. कारण- तो दिवसातून अनेक वेळा वापरला जातो. त्याचप्रमाणे जिम किंवा जास्त घाम आल्यानंतर वापरलेला टॉवेल पुन्हा वापरण्यापूर्वी धुणे योग्य ठरते.
दुर्गंधी आल्यास समजून जा की, टॉवेल धुवायला टाकण्याची गरज आहे. जर टॉवेल दिसायला स्वच्छ असेल; पण त्याला दुर्गंधी येत असेल, तर तो पुन्हा वापरण्याऐवजी धुऊन घ्या. टॉवेल स्वच्छ ठेवण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे तो वापरल्यानंतर तो चांगला वाळवणे आणि काही वेळा वापरल्यानंतर तो धुणे.
