How Often to Wash Towels: दैनंदिन आयुष्यात आपण आंघोळीनंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर टॉवेलचा वापर करतो. शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा टॉवेलही नियमितपणे स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकजण एकच टॉवेल अनेक दिवस वापरतात. मात्र, ओलसर राहणाऱ्या टॉवेलमध्ये जंतू, बुरशी आणि जीवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टॉवेल किती दिवसांनी धुवावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी टॉवेल धुतल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या टाळता येऊ शकतात.

टॉवेल किती वेळा धुणे गरजेचे?

तज्ज्ञांच्या मते, आंघोळीचा टॉवेल साधारणपणे तीन ते चार वेळा वापरल्यानंतर धुवावा. जर हवामान दमट असेल किंवा टॉवेल वापरल्यानंतर व्यवस्थित वाळत नसेल, तर तो यापेक्षाही लवकर धुणे योग्य ठरते. चेहरा पुसण्यासाठी वापरला जाणारा टॉवेल किंवा हँड टॉवेल अधिक वारंवार धुण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यांचा वापर दिवसातून अनेक वेळा केला जातो.

ओलसर टॉवेलमध्ये घाम, मृत त्वचेच्या पेशी आणि शरीरावरील नैसर्गिक तेल साचू शकते. अशा वातावरणात जीवाणू आणि बुरशी वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होते. परिणामी त्वचेवर पुरळ, खाज, फंगल इन्फेक्शन किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना त्वचारोगाचा त्रास आहे, त्यांनी टॉवेलच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

टॉवेल कसा धुवायचा?

टॉवेल धुताना कोमट पाणी आणि योग्य डिटर्जंटचा वापर केल्यास त्यावरील घाण आणि जंतू प्रभावीपणे निघून जातात. धुतल्यानंतर टॉवेल पूर्णपणे उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी वाळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ओलसर अवस्थेत टॉवेल घडी करून ठेवू नये. तसेच, शक्यतो प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल वापरावा. एकाच टॉवेलचा अनेकांनी वापर केल्यास संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो.

टॉवेल हा रोजच्या वापरातील साधा वाटणारा पण आरोग्याशी थेट संबंधित असलेला वस्तू आहे. त्यामुळे तो स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याची सवय लावणे गरजेचे आहे. नियमितपणे टॉवेल धुणे, योग्य प्रकारे वाळवणे आणि वेळोवेळी नवीन टॉवेल वापरणे या साध्या सवयींमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)