करोनाची तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो, थकवा आलेला असतो. काही रुग्णांमध्ये हालचाल केल्यासही ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रुग्ण घाबरून हालचालदेखील करत नाहीत. विशेषकरून अतिदक्षता विभागातील, कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्ण बराच काळ पाठीवर पडून असतात. अशा रुग्णांना औषधोपचारासह फिजिओथेरपीची जोड दिल्यास प्रकृतीत सुधारणा होण्यास नक्कीच मदत होते.
फिजिओथेरपीमुळे रुग्णांना होणारा फायदा
* कामाची कार्यक्षमता वाढणे
* थकवा कमी होणे
* फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण वाढणे
* स्नायूंची ताकद वाढविणे
* फुफ्फुसांची क्षमता वाढविणे
करोना विषाणूचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. ज्यामुळे वायुकोशांमध्ये द्रव भरले जाते आणि फुफ्फुस खराब होतात. परिणामी ऑक्सिजनची देवाणघेवाण होण्यात अडचणी येतात.
दम लागत असल्यास..
या रुग्णांना खूप प्रमाणात दम लागत असल्याने दम करणाऱ्या काही स्थितींचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होतो. जर तुम्हाला दम लागला तर खालीलप्रमाणे शारीरिक स्थितींचे आचरण करावे. एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन आपले हात स्थिर करा, जेणेकरून श्वास घेण्यास मदत होईल.
श्वसनाची क्षमता वाढविण्यासाठी..
फुफ्फुसातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि श्वसनाची क्षमता वाढविण्यासाठी काही श्वसाचे व्यायाम करणे फायदेशीर आहेत. यात खोल श्वास घेणे महत्त्वाचे आहे.
नाकातून हळूहळू श्वास घ्या आणि तोंडातून (जणू काही मेणबत्ती विझवत आहोत) फुंकर मारत (खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे) श्वास बाहेर सोडा.
पोटाची श्वसनक्रिया – श्वासाच्या स्नायूंचा वापर करून
* निवांत आरामात बसा किंवा झोपा
* पोटावर हात ठेवा
* आपलं पोट एका फुग्याप्रमाणे असल्याची कल्पना करा, जेणेकरून जेव्हा आपल्या नाकातून श्वास घ्याल, तेव्हा आपला हात बाहेर जाईल.
* आणि जेव्हा आपण तोंडाद्वारे श्वास बाहेर सोडाल, तेव्हा हात आतल्या बाजूला जाईल.
काही विशिष्ट शारीरिक स्थितींमध्ये झोपल्यास फुफ्फुसांनी अधिक चांगल्या प्रकारे श्वास घेण्यासाठी मदत होते. कमीत कमी ३० मिनिटांसाठी या स्थितीत शरीर ठेवावे. ठरावीक वेळेनुसार शारीरिक स्थिती बदलत राहणे. पोटावर झोपल्याने आपल्या फुफ्फुसातील महत्त्वाच्या भागांमध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजन पोहोचतो. डॉक्टरांच्या सल्लय़ाने आपल्यासाठी योग्य स्थिती विचारून त्यानुसार तिचा अवलंब करणे फायदेशीर आहे.
(साभार : फिजिओथेरपी विभाग, केईएम रुग्णालय-मुंबई)