Sleep Impact On Brain, Sleep And Mental Health: झोप म्हणजे केवळ विश्रांतीची वेळ नाही, तर पुरेसा आराम मिळाल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण, उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांच्या झोपेवर गंभीर परिणाम होत आहे. सततची अपुरी झोप तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
निरोगी शरीरासाठी ७-८ तासांची झोप अनिवार्य
जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला मेंदू दिवसभरातील माहितीवर प्रक्रिया करतो आणि शरीर स्वतःची दुरुस्ती (Repair) करत असते. सतत कमी झोप घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. उत्तम आरोग्यासाठी दररोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हृदयविकाराचा वाढता धोका
झोपेचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो. तज्ञांच्या मते, जे लोक ५ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता सर्वाधिक असते. अपुऱ्या झोपमुळे स्ट्रेस हार्मोन ‘कोर्टिसोल’ वाढते, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका असतो.
मधुमेह आणि लठ्ठपणाशी संबंध
झोपेचा अभाव शरीरातील इन्सुलिनचे संतुलन बिघडवतो, त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. याव्यतिरिक्त, झोप पूर्ण न झाल्यामुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स विस्कळीत होतात, त्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो.
मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम
अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
चिडचिड आणि राग: पुरेशी झोप न मिळाल्यास व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा वाढतो आणि भावनांवर नियंत्रण राहत नाही.
एंग्जायटी आणि डिप्रेशन: दीर्घकाळ झोप न मिळाल्यास नैराश्य आणि चिंतेसारख्या मानसिक आजारांचा धोका वाढतो.
एकाग्रतेचा अभाव: स्मरणशक्ती कमकुवत होते आणि कामात किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
रोगप्रतिकारशक्तीवर (Immunity) होणारा परिणाम
जे लोक ७-८ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. शरीरातील संसर्गाशी लढणारे ‘सायटोकाइन’ प्रोटीन आणि अँटीबॉडीज कमी होतात. यामुळे अशा व्यक्तींना वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
उत्तम झोप मिळवण्यासाठी काय करावे?
तुमची जीवनशैली आणि सवयींमध्ये थोडे बदल करून तुम्ही झोपेचा दर्जा सुधारू शकता.
वेळापत्रक पाळा: दररोज झोपण्याची आणि उठण्याची एकच वेळ निश्चित करा.
स्क्रीनपासून दूर राहा: झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर बंद करा.
कॅफिन टाळा: रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिणे टाळा.
शांत वातावरण: झोपण्यासाठी शांत आणि अंधारी खोली निवडा.
अनेकजण कमी झोप घेऊनही काम करू शकतात असा दावा करतात, मात्र अंतर्गतरीत्या शरीराचे नुकसान होत असते. निरोगी राहण्यासाठी सकस आहार आणि व्यायामासोबतच ‘क्वालिटी स्लीप’ला प्राधान्य देणे काळाची गरज आहे.
