Natural Remedies for Motion Sickness : बस, कार, ट्रेनमधून प्रवास करताना अनेक लोकांना मळमळते किंवा उलटी येणार असं सतत वाटू लागते. याला सामान्यतः ‘मोशन सिकनेस’ म्हणून ओळखले जाते. डोळे, कान आणि मेंदूला शरीराच्या हालचालींबाबत वेगवेगळी माहिती मिळाल्यावर मोशन सिकनेस होतो. काही लोकांवर याचा परिणाम होत नाही, तर काही जण अत्यंत अस्वस्थ होतात. यामुळे चक्कर येणे, अस्वस्थता, घाम येणे, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. या समस्येमुळे अनेक जण प्रवासाआधी गोळी, आवळा-सुपारी घेतात किंवा प्रवासात काहीच खात नाहीत जेणेकरून उलटी होणार नाही.

पण मोशन सिकनेस टाळण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी सुद्धा करून पाहू शकता…

रिकाम्या पोटी प्रवास करणे टाळा

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, रिकाम्या पोटी उलटी होत नाही. पण, असे केल्याने समस्या आणखीन वाढू शकते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हलके आणि सहज पचणारे अन्न खा.

आल्याचा चहा

प्रवासाला निघण्यापूर्वी आल्याचा चहा प्या. आले तुमचे पोट शांत करण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला चहा प्यायचा नसेल, तर तुम्ही आल्याचा एक छोटा तुकडा चावू शकता. यामुळे मळमळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिंबू

प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान लिंबाचा सुगंध घ्या. त्याच्या ताजेपणामुळे अनेक लोकांना आराम मिळतो किंवा तुम्ही लिंबू पाणी देखील पिऊ शकता.

पुदिना

जर तुम्हाला प्रवासात मळमळ होत असेल, तर पुदिना खाऊन बघा. पुदिना पोटाला थंडावा देण्यास आणि मळमळ कमी करण्यास मदत करू शकतो. प्रवासादरम्यान पुदिन्याचा चहा किंवा पुदिन्याची पाने तुम्हाला आराम देऊ शकतात.

बडीशेप

बडीशेप पोट शांत ठेवण्यास मदत करते असे मानले जाते. प्रवासादरम्यान थोडी बडीशेप चावल्यास तोंडाला ताजेतवाने वाटते आणि मळमळ किंवा अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.

पाणी

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मळमळ आणि अशक्तपणा वाढू शकतो. त्यामुळे, प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान थोडे थोडे पाणी प्या.

ताजी हवा

जर तुम्ही कार किंवा बसने प्रवास करत असाल, तर खिडकीजवळ बसण्याचा प्रयत्न करा. ताजी हवा घेतल्याने गुदमरल्यासारखे वाटणे आणि मळमळ कमी होऊ शकते.

फोनकडे पाहणे टाळा

प्रवासादरम्यान सतत मोबाईल फोन वापरणे, पुस्तक वाचणे किंवा स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने प्रवासातील मळमळ वाढू शकते.