Morning Routine Tips For Office Workers : दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही सुस्ती जाणवते, ऑफिसला जाण्याच्या विचारानेच कंटाळा येतो. पण तरीही नाईलाजास्तव रडत रडत ऑफिससाठी तयार व्हावे लागते. यावेळी ऑफिसला जाणं टाळण्यासाठी काही कारण सांगता आले तर बरे झाले असते असे वाटत राहते. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर हे केवळ आळसामुळे नाही, तर तुमच्या सकाळच्या चुकीच्या सवयींमुळे होते. तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात काही लहान सवयी लावल्यास मनस्थिती सुधारते, ऊर्जा येते आणि काम करण्याची इच्छा होते.
१) झोपेतून उठल्यानंतर लगेच मोबाईल घेऊ नका
हार्टफोर्ड हेल्थकेअर मेडिकल ग्रुपचे एमडी, टेलर अबेली यांच्या मते, तुमची सकाळ अधिक उत्साही व्हावी यासाठी तुम्ही दररोज काही सोप्या गोष्टी करू शकता. असे केल्याने तुमच्या तुमच्या रूटीनमध्ये सकारात्मक बदल होतील. तज्ञांच्या मते, सोशल मीडिया किंवा ईमेल तपासल्याने तुमचे मन लगेचच तणाव आणि तुलनेच्या अवस्थेत जाते. म्हणून, दिवसाची पहिली १५-२० मिनिटे फोनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
२) हायड्रेशनने सुरुवात करा
डॉ. अबेली यांच्या मते, सात ते आठ तासांच्या झोपेनंतर आपल्या शरीरातील पाणी नैसर्गिकरित्या कमी होते. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया सुरू होते, पचनक्रिया सुधारते आणि तुमचे मन ताजेतवाने राहते. अगदी सौम्य डिहायड्रेशनमुळेही लवकरच थकवा आणि विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तुमच्या रात्रीच्या टेबलावर पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली किंवा ग्लास ठेवा, जेणेकरून शरीरात पाण्याची पातळी आपोआप राखली जाईल.
३) १० मिनिटे शारीरिक हालचाल करा
सकाळी उठल्याबरोबर हलका व्यायाम, चालणे किंवा काही मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि मनःस्थिती सुधारणारे हार्मोन्स स्रवण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला ऑफिसला जाण्याची इच्छा होण्याची शक्यताही वाढू शकते.
४) दिवसाचे एक टार्गेट निश्चित करा
सकाळी उठल्याबरोबर कामांची भलीमोठी यादी पाहण्याऐवजी, दिवसासाठी एकच महत्त्वाचे ध्येय निश्चित करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि तुम्हाला सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करण्यास मदत होते.
