Common Reasons You’re Not Losing Weight : अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. निरोगी राहण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वजन वाढल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. तुमचा आहार योग्य असेल, व्यायाम नियमित असेल आणि तरीही वजन कमी होत नसेल, तर तुम्ही एकटे नाही आहात किंवा तुम्ही काहीही चुकीचे सुद्धा करत नाही आहात.

फिटनेस ट्रेनर बॉबीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर वजन कमी का होत नाही याबद्दलच्या खऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्या मते, वजन कमी होणं फक्त कॅलरी कमी खाणं किंवा जास्त कार्डिओ करणं यावर अवलंबून नसते. अनेक लोकांच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाणी, ताण आणि झोप अशा मूलभूत गोष्टी महत्वाच्या असतात. पण, अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे या तिन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या का आहेत याबद्दल जाणून घेऊयात…

पाणी

जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल, तर तुमच्या शरीराला त्याचे काम व्यवस्थित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मूत्रपिंडांची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा शरीराला पाण्याची कमतरता जाणवते, तेव्हा ती कार्यक्षमतेने काम करू शकत नाहीत, ज्यामुळे यकृताला मदत करावी लागते.

मग समस्या काय आहे? तर यकृत चरबीचे चयापचय करण्याचे कामही करते. जेव्हा ते विषारी पदार्थांना हाताळण्यात व्यस्त असते, तेव्हा शरीरातील चरबी कमी करण्याचे काम मागे पडते. याचा परिणाम म्हणजे शरीरात, विशेषतः पोटाच्या खालच्या भागात, चरबीचा साठा वाढतो. त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याव्यतिरिक्त, हायड्रेशन चयापचय आणि भूक नियंत्रणास देखील मदत करते. सौम्य निर्जलीकरणामुळे भुकेसारखी भावना येऊ शकते; ज्यामुळे अनेकदा अनावश्यकपणे आपल्याकडून काहीतरी खाल्ले जाते. त्यामुळे पाण्याची बाटली जवळ ठेवणं हे फक्त हेल्थ टिप किंवा फॅशन नाही, तर शरीराच्या नैसर्गिक कामासाठी खूप महत्वाचं आहे.

तणाव

तणाव ही आता केवळ एक भावनिक अवस्था राहिलेली नाही; ती एक हार्मोनल अवस्था देखील आहे. जेव्हा तुम्ही सतत दबावाखाली असता, तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन सोडते.जेव्हा शरीरात कॉर्टिसोल जास्त वाढतो, तेव्हा आपल्याला जास्त भूक लागते आणि विशेषतः गोड आणि तेलकट पदार्थ खायची इच्छा वाढते.जरी तुमचा आहार तांत्रिकदृष्ट्या ‘योग्य’ असला तरी, दीर्घकालीन तणाव चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतो. उच्च कॉर्टिसोल पातळी केवळ जास्त खाण्यास, चयापचय क्रिया मंदावून शरीरात, विशेषतः पोटाभोवती, चरबी साठवण्यास प्रोत्साहन देते. ज्या पोटाच्या चरबीबद्दल अनेक लोक तक्रार करतात, त्यामागे अनेकदा तणाव हे एक कारण असते. तणाव कमी करण्यासाठी जीवनशैलीत मोठे बदल करण्याची गरज नाही. चालणे, हलका व्यायाम, श्वासोच्छ्वासचे व्यायाम किंवा शांततेचे काही क्षण हे सर्व कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

झोप

झोप ही सगळ्यात महत्वाची आहे. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. तेव्हा कोर्टिसोलची पातळी पुन्हा वाढते आणि हार्मोनची पातळी कमी होते. गाढ झोप लागली की, ग्रोथ हार्मोन तयार होतो. हा हार्मोन शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. गाढ झोपेच्या वेळी स्नायूंची दुरुस्ती, पुनर्प्राप्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच चरबीच्या चयापचयासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तुमच्या झोपेशी तडजोड केल्यास, तुम्ही तुमच्या शरीराच्या पुनर्बांधणी आणि चरबी कमी करण्याच्या क्षमतेशी तडजोड करू शकता.

यामध्ये भुकेचाही मोठा संबंध असतो. झोप आपल्या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सना संतुलित ठेवते. शरीराला पोट भरलंय हे लवकर समजतं आणि अनावश्यक खाणं टाळता येतं. क्रेविंग्स कमी होतात. दुसऱ्या दिवशी जास्त खाण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा आपल्याला कळतही नाही आणि आपण जास्त खातो. त्यामुळे सर्वात आधी झोपेला प्राधान्य द्या. चांगली झोप घेतली तर वजनाशी संबंधित अनेक समस्या आपोआप सोप्या होतात.

बॉबीच्या संदेशातून एक अशी गोष्ट अधोरेखित होते, जी अनेकांना ऐकायची नसते: वजन कमी करणे हे केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून नसते. तर ते तुमच्या शरीराच्या योग्य कार्यासाठी योग्य अंतर्गत वातावरण तयार करण्याबद्दलही असते. तुम्ही व्यायाम करू शकता आणि पौष्टिक आहार सुद्धा घेऊ शकता. पण, जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तुम्ही सतत तणावाखाली असाल, अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला थकवा येत असेल तर तुमचे शरीर बदल करण्याला विरोध करू लागते. याचा अर्थ असा होत नाही की, तुमचे शरीर बिघडले आहे, तर ते स्वतःचे संरक्षण करत असते. कधीकधी, अधिक प्रयत्न केल्याने प्रगती होत नाही. तर मूलभूत गोष्टींना अधिक चांगल्या प्रकारे आधार दिल्याने प्रगती होते.