Heart Health Tests at Home: लोक आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात, रक्ताच्या चाचण्या करतात आणि वजन तपासतात. मात्र, हृदयाचे आरोग्य कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची किंवा अनेक मशीनची गरज नाही. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, घरच्या घरी काही सोप्या हालचाली करूनही हृदयाचे आरोग्य तपासता येते.
डॉक्टर नवीन भामरी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ३ चाचण्यांच्या मदतीने हृदयाची कार्यक्षमता, स्नायूंची ताकद आणि व्यायामानंतर हृदयाचे ठोके पुन्हा सामान्य होण्याचा वेग तपासता येतो. चला, जाणून घेऊया या ३ चाचण्या कोणत्या आहेत.
१. जिने चढण्याची चाचणी
पहिली चाचणी शरीराची काम करण्याची आणि शारीरिक मेहनत सहन करण्याची क्षमता तपासण्यासाठी आहे. डॉ. भामरी यांनी यासाठी एक सोपे आव्हान सांगितले आहे. तुम्हाला ६० सेकंदांत, न थांबता आणि जिन्याचा कठडा न पकडता ६० पायऱ्या चढायच्या आहेत. एवढ्या वेगाने जिने चढताना शरीर कशी प्रतिक्रिया देते, यावरून हृदयाची कार्यक्षमता समजू शकते.
डॉक्टरांच्या मते, जर जिने चढताना तुमचा श्वास फुलत नसेल, छातीत दुखत नसेल आणि तुम्ही न थांबता जिने चढू शकत असाल, तर एकूणच तुमची शारीरिक तंदुरुस्ती चांगली आहे.
२. खुर्चीवर बसण्या-उठण्याची चाचणी
दुसऱ्या चाचणीच्या मदतीने शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंची ताकद आणि सहज हालचाल करण्याची क्षमता तपासता येते. ही चाचणी विशेषतः ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, ही चाचणी करण्यासाठी एका साध्या खुर्चीवर बसा आणि दोन्ही हात छातीवर घडी घालून ठेवा. खुर्चीचे हँडल न पकडता, जर तुम्ही ४० वर्षांनंतरही न थांबता १६ पेक्षा जास्त वेळा खुर्चीवर बसू आणि उठू शकत असाल, तर तुमची शारीरिक तंदुरुस्ती चांगली आहे.
याउलट, जर तुम्हाला १४ पेक्षा कमी वेळा बसण्या-उठण्याची क्रिया करता येत असेल, तर तुमच्या शारीरिक क्षमतेत सुधारणा करण्याची गरज असू शकते, असे त्यांनी सांगितले.
३. हृदयाचे ठोके पुन्हा सामान्य होण्याची चाचणी
कोणतेही जड काम केल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतात. हे ठोके पुन्हा सामान्य होण्यासाठी किती वेळ लागतो, हे तपासणे म्हणजेच हृदयाच्या ठोक्यांच्या रिकव्हरीची चाचणी होय.
या चाचणीवरून शारीरिक मेहनतीनंतर शरीरातील स्वायत्त मज्जासंस्था किती चांगल्या प्रकारे पूर्ववत काम करू लागते, याची माहिती मिळते.
हृदयरोगतज्ज्ञांनी ३ ते ५ मिनिटे कार्डिओ व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी धावणे, जिने चढणे किंवा ट्रेडमिलवर चालणे असे व्यायाम करता येतात. व्यायाम पूर्ण झाल्यानंतर लगेच तुमच्या हृदयाचे ठोके मोजा. त्यानंतर नेमका एक मिनिट आराम करा आणि पुन्हा हृदयाचे ठोके मोजा. यामुळे एका मिनिटात हृदयाचे ठोके किती कमी झाले, हे समजेल.
जर एका मिनिटानंतर तुमच्या हृदयाचे ठोके २५ पेक्षा जास्त कमी झाले, तर तुमची रिकव्हरी खूप चांगली आहे, असे मानले जाते. दुसरीकडे, हृदयाचे ठोके १२ पेक्षा कमी कमी झाले, तर हृदयाचे ठोके सामान्य होण्याच्या प्रक्रियेत अडचण असू शकते. हे तुमच्या एकूण हृदयाच्या तंदुरुस्तीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे संकेत देऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
