How To Check Leg BP : आतापर्यंत तुम्ही फक्त हाताचाच रक्तदाब तपासला असेल किंवा रुग्णालयात तपासताना पाहिला असेल. रक्तदाब उच्च आहे की नीचतम, हे जाणून घेण्यासाठी रक्तदाबाची चाचणी केली जाते. मात्र, पायाचा रक्तदाब तपासून शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेज आहे का, याचाही शोध घेता येतो. घरच्या घरी असलेल्या डिजिटल बीपी मशीनच्या मदतीने तुम्ही ही चाचणी सहज करू शकता. यासाठी पायाच्या घोट्यावरील (अँकल) बीपी रीडिंगला दोन्ही हातांपैकी ज्या हाताचे वरचे रीडिंग जास्त आले असेल त्याने भाग (डिव्हाईड) दिला जातो.

पायाचा बीपी कसा मोजावा?

तुमच्याकडे घरात जे रक्तदाब तपासणी यंत्र आहे, त्याच यंत्राचा वापर करून पायाचा रक्तदाब मोजता येतो.
१. सर्वांत आधी तुमच्या हाताचा रक्तदाब तपासा आणि रक्तदाब तपासणी यंत्रामधील आकडेवारी लिहून ठेवा. (अशा प्रकारे दोनदा तपासणी घ्या).

२. आता रक्तदाब मोजणाऱ्या यंत्राचा तोच पट्टा तुमच्या पायाच्या घोट्याच्या (अँकल) थोडा वर बांधा आणि यंत्र सुरू करून, पायाच्या रक्तदाबाची आकडेवारी नोंदवून ठेवा.
३. अशा प्रकारे तुमच्याकडे हात आणि पाय दोन्ही रक्तदाबाच्या आकडेवारीची नोंद तुमच्याकडे राहील.

ब्लॉकेज कसे ओळखायचे?

ब्लॉकेजची शक्यता तपासण्यासाठी तुम्हाला हात आणि पायाच्या बीपीमधील फक्त वरच्या संख्या लक्षात घ्यायच्या आहेत. खालील संख्यांचा (Systolic BP) यात काही संबंध नसतो.

आता पायाच्या रक्तदाब दाखविणाऱ्या वरच्या संख्येला हाताच्या वरच्या संख्येने भाग (डिव्हाईड) द्या.

मिळालेले उत्तर १.० ते १.३ यादरम्यान असेल, तर तुमचा रक्तदाब आणि रक्तवाहिन्या अगदी सामान्य (Normal) आहेत.

हे उत्तर १.४ पेक्षा जास्त असल्यास धमन्या (Arteries) कडक किंवा कॅल्सीफाईड होण्याचा धोका असतो.

०.९ पेक्षा कमी : जर उत्तर ०.९ पेक्षा कमी आले, तर शरीरात किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये (आर्टरीज) ब्लॉकेज असण्याची दाट शक्यता असते.

पायाचा बीपी कमी येण्याचा अर्थ काय?

जर पायाचा रक्तदाब हाताच्या रक्तदाबापेक्षा कमी येत असेल, तर शरीरात कुठेतरी ब्लॉकेज असू शकते. लक्षात ठेवा, ही केवळ प्राथमिक पातळीवर धोक्याचा अंदाज व्यक्त करणारी चाचणी आहे. जरी चाचणी अहवाल सामान्य असला तरीही ब्लॉकेजची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण, जर दर्शविल्या जाणाऱ्या संख्या प्रमाणापेक्षा कमी असल्या तरी तो ब्लॉकेजचा संकेत असू शकतो, त्यामुळे असा फरक आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन सविस्तर तपासणी करून घ्यावी.