How to choose coconut with more water : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. पाण्यासह अन्यही पोषक सत्व मिळण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळेच उन्हाळ्यात नारळ पाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढते आणि परिणामी, त्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढतात. अनेकदा, नारळ विकत घेतल्यानंतर असे दिसून येते की, त्यात पाणी कमी आणि मलई जास्त आहे. पण, जास्त पाणी असलेला नारळ निवडण्याच्या युक्तीबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? नाही… तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
पुढील काही ट्रिक लक्षात ठेवलात तर तुमची फसवणूक सुद्धा होणार नाही. फक्त नारळ विकत घेताना तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यामुळे नारळात पाणी जास्त आहे की मलई, हे ठरवण्यास तुम्हाला मदत होईल.
पाणी जास्त हवं असल्यास…
गोल नारळ खरेदी करा – नारळ खरेदी करताना त्याच्या आकाराकडे लक्ष द्या. साधारण गोल आकाराचे नारळ निवडण्याचा प्रयत्न करा.
नारळ हलवून बघा – जेव्हा तुम्ही नारळ विकत घेता. तेव्हा तो हलवून बघा. तुम्ही शहाळं हलवून पाहिल्यास जर आतून पोकळ आवाज आला तर त्यात पाणी कमी असू शकते.
कानाजवळ धरल्यास तुम्हाला आत पाणी हलल्याचा आवाज ऐकू येईल. जर आवाज आला तर त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.
नारळाच्या वजनाकडे लक्ष द्या – जर नारळ उचलल्यावर जड वाटत असेल, तर त्यात पाणी जास्त असू शकते. जड नारळांमध्ये सहसा पाणी जास्त असते, तर हलक्या नारळांमध्ये मलई जास्त असू शकते.
नारळाच्या वरचा भाग तपासून पाहा – नारळ खरेदी करताना जर वर काळे डाग किंवा भेगा दिसत असतील तर असा नारळ घेऊ नका. अशा नारळात पाणी कमी असू शकतं. त्यामुळे शहाळं हिरवेगार असल्यास उत्तम, यावर शक्यतो ब्राऊन किंवा पिवळे डाग असल्यास शहाळं अधिक पिकलेलं असू शकतं. शहाळ्याच्या वरची व खालची बाजू किंचित दाबून पहा, जर हा भाग नरम असेल किंवा बोटाने दाबला जात असेल तर असे नारळ घेणे टाळा.
तुम्हाला खोबरं जास्त हवं असल्यास…
- नारळ घेताना एखाद्या अंगठीने किंवा नाण्याने वाजवून पाहा, पोकळ आवाज येत असल्यास खोबरे कमी असू शकते.
- नारळ किंचित हलवल्यास पाणी जास्त असेल तर खोबरं कमी आहे असे समजून जा
- नारळ स्वतः निवडा. सहसा दुकानदार नारळ देतात तेव्हा आकाराने मोठे फळ देतात.
नारळ पाणी पिण्याचे फायदे…
नारळाच्या पाण्यातील पोटॅशिअमने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. उत्तम नारळ निवडण्यासाठीच्या वर दिलेल्या टिप्स वाचून तुम्हीही योग्य निवड करण्याचा प्रयत्न कराल.
