Car Cleaning Hack : बटाटा केवळ जेवणाची चव वाढवणारी भाजी नाही, तर कार स्वच्छ करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या एका साध्या बटाट्यामुळे कारच्या विंडशील्डवरील पाण्याचे डाग आणि फॉग कमी करण्याची ही ट्रिक सध्या चर्चेत आहे. यासाठी कोणत्याही महागड्या क्लीनर किंवा स्पेशल केमिकलची गरज भासत नाही.

बटाट्यामुळे कारची काच कशी स्वच्छ होते?

बटाट्यामध्ये असणारे ‘स्टार्च’ (Starch) हे या ट्रिकमागील मुख्य कारण आहे. जेव्हा कच्चा बटाटा मधोमध कापून कारच्या काचेवर घासतात, तेव्हा त्याचा एक हलका थर काचेच्या पृष्ठभागावर तयार होतो. हा थर पाण्याचे थेंब काचेवर जास्त वेळ टिकू देत नाही आणि पाणी सहज निसटून जाण्यास मदत करतो. पावसाळ्यात यामुळे विंडशील्डवर पाण्याचे थेंब कमी साचतात, ज्यामुळे ड्रायव्हरला समोरील रस्ता अधिक स्पष्ट दिसू शकतो.

यामागे आहे ‘सरफेस टेंशन’चा खेळ

या व्हायरल हॅकच्या मागे विज्ञान दडलेले आहे. सामान्यतः पावसाचे थेंब कारच्या काचेवर पसरतात आणि एक फॉगचा तयार करतात, ज्यामुळे समोरचे दिसणे कठीण होते. परंतु, स्टार्चच्या थरामुळे पाण्याचे थेंब काचेच्या पृष्ठभागावर पसरण्यापासून काही प्रमाणात रोखले जातात. यामुळे पाण्याचे थेंब गोल आकारात राहतात आणि कारचा वेग किंवा हवेच्या दाबामुळे सहज खाली घसरतात. म्हणूनच, महागड्या उत्पादनांशिवाय काचेवर पाण्याचा प्रभाव कमी दिसून येतो.

कसा करायचा हा बटाट्याचा कार क्लीनिंग हॅक?

  • सर्वात आधी कारची काच एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
  • एक कच्चा बटाटा घेऊन तो मधोमध कापून घ्या.
  • बटाट्याचा कापलेला भाग विंडशील्ड, साईड मिरर आणि मागच्या काचेवर व्यवस्थित घासा.
  • ते काही वेळ सुकू द्या.
  • त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने (Microfiber Cloth) काच हलक्या हाताने स्वच्छ पुसून घ्या.
  • यामुळे काचेवर बटाट्याच्या स्टार्चचे डागही राहणार नाहीत आणि काच चमकेल.

स्वस्त, सोपा आणि घरगुती उपाय

या ट्रिकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा अत्यंत कमी खर्च. बाजारात मिळणारे ग्लास क्लीनर आणि कोटिंग प्रॉडक्ट्स महाग असतात, तर बटाटा घरात सहज उपलब्ध होतो. मात्र, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, हा कोणताही कायमस्वरूपी उपाय किंवा प्रोफेशनल ट्रीटमेंट नाही. कारच्या नियमित देखभालीसाठी चांगल्या क्लीनिंग प्रॉडक्ट्सचा वापर करणे केव्हाही योग्य ठरते.