Home Fan Cleaning Tricks : घरातील सर्वात कंटाळवाणे काम म्हणजे सिलिंग फॅन स्वच्छ करणं. विशेषत: जेव्हा फॅन फार उंचावर असतो, तेव्हा तो नेहमी स्वच्छ करायचा तरी कसा असा प्रश्न पडतो. धुळीने माखलेला फॅन शिडी, स्टूलशिवाय स्वच्छ करणं अनेकदा शक्य होत नाही. यात काहींना गुडघेदुखी, पाठदुखी आणि गर्भधारणेमुळे टेबल, शिडीने फॅन साफ करणे शक्य होत नाही, अशावेळी तुम्ही खालील ट्रिक्स फॉलो करुन काही मिनिटांत फॅन एकदम चकाचक करु शकता.

एका महिलेने युट्यूबवर एका भन्नाट ट्रिक शेअर केली आहे जी आता व्हायरल होतेय, ज्यात तिने जुन्या मॉप आणि काही रबर बँडचा वापर करुन फॅन कसा क्लीन करायचा हे सांगितले आहे. ही पद्धत केवळ सोपी नाही तर यामुळे तुमचा बराच वेळ आणि मेहनत देखील वाचवते.

सिलिंग फॅन स्वच्छ करण्याची ट्रिक

सिलिंग फॅन शिडीवर न चढता स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एक जुना मॉप लागेल ज्याला एक लांब काठी जोडा. प्रथम मॉपच्या ब्रिस्टल्सचे दोन समान भाग करा. ही पद्धत केवळ सोपी नाही तर ज्या घरांमध्ये शिडी उपलब्ध नाही अशा घरांमध्ये देखील साफसफाई करणे शक्य करते.

रबर बँडचा वापर

मॉपचे दोन भाग केल्यानंतर त्यांना प्रत्येक बाजूला थोड्या अंतराने मजबूत रबर बँडने बांधा. मॉपची दोन्ही टोकही रबर बँडने बांधा. यामुळे मॉपच्या मध्यभागी एक पॅकेटसारखा गॅप तयार होईल. या गॅपमध्ये फॅनचे ब्लेडस सहजपणे अडकून ते नीट स्वच्छ होतील.

फॅनचे ब्लेड साफ करण्याची पद्धत

तुम्ही अशाप्रकारे या फॅन क्लिनरला बांधलेल्या लांब काठीच्या साहाय्याने मॉपच्या गॅपमध्ये फॅनच्या तीन ब्लेडपैकी एक ब्लेड घाला. मॉपच्या दोन्ही बाजू रबर बँडने बांधल्या असल्याने त्याने ब्लेडच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंवर दाब येईल, ज्यामुळे धूळ साफ करणे सोपे होईल.

कोरडी धूळ काढून टाकणे

प्रथम ब्लेडवरील जाड धूळ काढण्यासाठी मॉप ओला न करता तो कोरडा फिरवा. यासाठी मॉप ब्लेडवर पुढे-मागे फिरवा. अशाने फॅनच्या ब्लेडवरील कोरडी धूळ मॉपच्या धाग्यांमध्ये अडकेल, ज्यामुळे ती जमिनीवर पडण्याची शक्यता कमी होईल.

होममेड क्लीनरने करा स्वच्छ

एकदा कोरडी धूळ काढून टाकली की, तुम्ही होममेड क्लिनर बनवा. यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये थोडे पाणी, व्हाईट व्हिनेगर आणि डिश वॉशर घेऊन ते चांगले मिसळा. हे लिक्विड मॉपच्या दोन्ही भागांवर स्प्रे करा आणि त्याने फॅनचे ब्लेड पुसून काढा. व्हिनेगरमुळे पंख्यावरील हट्टी डाग आणि धूळ लगेच निघते.