Kitchen Sink Cleaning Hacks : किचनच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. हा घरातील असा एक कोपरा आहे, जिथे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जाणे अत्यावश्यक आहे. अनेकदा लोक रात्री स्वयंपाक झाल्यावर किचन स्वच्छ करतात आणि लाईट बंद करून झोपतात. पण, लाईट बंद होताच सिंकच्या नालीतून लहान लहान काळे कीटक, झुरळ आणि कुबट वास बाहेर येऊ लागतो. तुमच्याही किचनमध्ये असेच काहीसे घडत असेल, तर बाजारातील महागड्या आणि घातक रासायनिक उत्पादनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही एक सोपा आणि घरगुती उपाय करून पाहू शकता.
नालीमध्ये कीटक आणि झुरळे का तयार होतात?
सिंकच्या नालीमध्ये कीटक आणि झुरळे का तयार होतात, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर त्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आपण जेव्हा सिंकमध्ये भांडी धुतो, तेव्हा अन्नाचे बारीक कण, तेल आणि तेलकटपणा ड्रेन पाईपमध्ये साचू लागतो.
कालपरत्वे हे साचलेले अन्न सडू लागते, ज्यामुळे नालीच्या आत जीवाणू, कीटक व झुरळांची उत्पत्ती होऊ लागते. रात्रीच्या शांततेत आणि अंधारात हे कीटक नालीतून बाहेर येऊन किचनचा ओटा आणि भांड्यांपर्यंत पोहोचतात, जी बाब आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची नाईट ट्रिक
रात्री झोपण्यापूर्वी केलेला हा सोपा उपाय सिंकची नाली आतून पूर्णपणे स्वच्छ आणि जंतूमुक्त (सॅनिटाईज) करू शकतो. हा उपाय करण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करा :
- सर्वांत आधी सिंकमधील साचलेले सर्व पाणी काढून टाका आणि नालीचा वरचा भाग कोरडा करा.
- आता अर्धा कप बेकिंग सोडा थेट नालीच्या छिद्रात टाका.
- बेकिंग सोडा टाकल्यानंतर लगेचच वरून एक कप व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) टाका.
- असे करताच नालीच्या आत एक तीव्र रासायनिक अभिक्रिया होईल आणि फेस तयार होऊ लागेल. अशा वेळी नालीचे तोंड एखाद्या झाकणाने झाकून रात्रभर ते तसेच राहू द्या.
- सकाळी उठल्यावर सर्वांत आधी दोन लिटर उकळते गरम पाणी नाल्यात ओता. त्यामुळे सर्व साचलेली घाण निघून जाईल.
‘हा’ उपाय करण्याचे फायदे :
झुरळे रात्री नालीतून बाहेर येऊन भांडी आणि ओट्यावर फिरतात, ज्यामुळे पोटात जंतुसंसर्ग आणि अन्न विषबाधेचा धोका असतो. नाली स्वच्छ राहिल्यामुळे हा धोका पूर्णपणे टळतो.
जर तुम्ही हा उपाय महिन्यातून दोन ते तीन वेळा केलात, तर ड्रेन पाईपमध्ये कचरा साचणार नाही आणि नाली कधीही तुंबणार नाही.
या सोप्या पद्धतीमुळे नाली आपोआप स्वच्छ होते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार प्लंबरला बोलावून दुरुस्तीसाठी खर्च करावा लागणार नाही.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे पदार्थ नालीतील दुर्गंधी शोषून घेतात, ज्यामुळे किचनमध्ये कुबट वास किंवा दुर्गंधीचा त्रास होत नाही.
