Liver Kidney Detox Drink: फॅटी लिव्हर म्हणजे अशी स्थिती, ज्यामध्ये लिव्हरच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी साचते. लिव्हरमध्ये चरबी वाढली की, शरीरात अनेक त्रास जाणवू लागतात. जसे की पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखणे किंवा जडपणा वाटणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, भूक कमी लागणे, मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे, पोट फुगणे, वजन वाढणे विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी.

गंभीर अवस्थेत त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, पाय सुजणे आणि लिव्हरला सूज येणे, असे त्रासही होऊ शकतात. फॅटी लिव्हरवर उपचार करायचे असतील, तर सर्वप्रथम आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.

एम्सचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, ताक हे असे पेय आहे, जे शरीराची आतून स्वच्छता करण्यास मदत करते. हे पेय शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास उपयुक्त मानले जाते. लिव्हरमधील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी ताक पिणे खूप प्रभावी ठरते.

ताकाला काही ठिकाणी मठ्ठा किंवा बटरमिल्क, असेही म्हणतात. हे दह्यापासून तयार केलेले पारंपरिक पेय आहे. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. चला तर मग जाणून घेऊया, ताक लिव्हरला कसे डिटॉक्स करते आणि लिव्हरचे आरोग्य कसे सुधारते.

ताक लिव्हरची स्वच्छता करून फॅटी लिव्हरवर कसा फायदा करते?

ताक (बटरमिल्क) हा नैसर्गिकरीत्या प्रो-बायोटिक्सचे चांगला स्रोत आहे. त्यात असलेले चांगले जीवाणू फक्त पचन सुधारत नाहीत, तर लिव्हरमधील सूज कमी करण्यासही मदत करतात. अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की, ताकामध्ये असलेले रायबोफ्लेविन लिव्हरवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास उपयुक्त ठरते.

ताक प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) सुधारते. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे लिव्हरवरील ताण कमी होतो. ताकामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वजन नियंत्रणात राहिल्यास लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साचण्याचा धोका कमी होतो.

द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, ताकामध्ये असलेल्या मिल्क फॅट ग्लोब्यूल मेंब्रेन (MFGM) मध्ये काही विशेष प्रथिने असतात. ही प्रथिने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतात.

त्यामुळे लिव्हरभोवती साचलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) होण्याचा धोका कमी होतो.

ताक आरोग्यास कसा फायदा करते?

ताक प्यायल्याने पचन व्यवस्थित राहते. ताकामध्ये असलेले प्रो-बायोटिक्स आतड्यांसाठी फायदेशीर असतात. ते अन्न पचवायला मदत करतात. ताक प्यायल्याने पोटातील गॅस, अपचन व आम्लपित्त (ॲसिडिटी) यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो.

ताकामध्ये चिमूटभर मीठ किंवा भाजलेले जिरे घालून पिल्यास जुलाबातही फायदा होऊ शकतो. ताक शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखण्यास मदत करते. उन्हाळ्यात ताक शरीराला थंडावा देते आणि पाण्याची कमतरता होऊ देत नाही. उष्म्यामुळे होणाऱ्या त्रासातही ते उपयुक्त मानले जाते. ताकामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

दुधाच्या तुलनेत ताकामध्ये चरबी कमी असते. हे हलके पेय आहे, जे पोट भरल्यासारखे वाटायला मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. किडनी आणि शरीराची स्वच्छता करण्यासही ताक मदत करते. ताक शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास उपयुक्त मानले जाते. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकते. सामान्यतः ताक हे उन्हाळ्यातील पेय मानले जाते, पण मर्यादित प्रमाणात हिवाळ्यातही ते पिणे योग्य ठरते.

ताक पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ

साध्या ताकामध्ये भाजलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिना घालून प्या. जिरे आणि पुदिना लिव्हरसाठी अधिक फायदेशीर असतात. ताक दुपारच्या जेवणासोबत पिणे योग्य ठरते. दुपारी ताक पिल्याने सर्दी-खोकल्याचा धोका कमी असतो. रात्रीच्या वेळी किंवा खूप थंड ताक पिणे टाळावे.