Wash Your Pillows Quick and Easy : तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यात बेडशीट आणि उशांचे कव्हर वेळोवेळी धुवून स्वच्छ करणे गरजेचे असते, अन्यथा विविध आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांकडूनही बेडशीट आणि उशांचे कव्हर वारंवार बदलण्याचा सल्ला दिला जातो. पण, अनेकांना यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी उशी न धुता अगदी नव्यासारखी स्वच्छ करण्याचे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे उशीवरील तेलकट, चिकटपणा होईल दूर…

उशी न धुता कशी स्वच्छ करावी

तेलकट उशा स्वच्छ करण्यासाठी हँड स्टीमरचा वापर करा. स्टीमरची गरम वाफ उशीच्या आत जाते आणि बॅक्टेरिया, धुळीचे कण आणि ॲलर्जी कमी करण्यास मदत करते. वाफ दिल्यानंतर उशी पूर्णपणे उन्हात वाळवा जेणेकरून सर्व ओलावा निघून जाईल आणि बुरशी वाढणार नाही.

उशी उन्हात सुकवा

उशी कडक सूर्यप्रकाशातदेखील ठेवू शकता. यामुळे दुर्गंधी दूर होऊ शकते आणि बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. आठवड्यातून एकदा फक्त ३-४ तासांसाठी तुमच्या उशीला सूर्यप्रकाशात ठेवा. सूर्यप्रकाशामुळे ओलावा आणि वास कमी होण्यास मदत होते, परंतु जंतू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी वेळोवेळी धुणे आणि खोल साफसफाई करणेदेखील आवश्यक आहे.

क्लिनिंग स्प्रे

व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून एक क्लिनिंग स्प्रे तयार करा. सुगंध वाढवण्यासाठी तुम्ही सुगंधी तेलाचे २-३ थेंब घालू शकता. हे क्लिनिंग लिक्विड स्प्रेने उशीवर हलकेच शिंपडा आणि उन्हात वाळवा. यामुळे वास आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.

जुन्या उशा फेकून नव्या उशा कधी घ्याव्यात?

जुन्या उशांमध्ये धूळ, घाम आणि बॅक्टेरिया जमा होतात, म्हणून वेळोवेळी उशी बदलणे महत्त्वाचे आहे. उशी साधारणपणे दर १ ते २ वर्षांनी बदलली पाहिजे, विशेषतः जर त्यातून खूप दुर्गंधी येत असेल, पिवळे, चिकट डाग, वास किंवा ॲलर्जी निर्माण झाली असेल तर ती ताबडतोब बदलणे चांगले. जास्त काळ एकच उशी वापरल्याने पाठदुखीदेखील होऊ शकते. चांगली झोप आणि स्वच्छतेसाठी उशी नियमितपणे बदलणे आवश्यक आहे, यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि आरोग्य दोन्ही सुधारते.