Chopping Board Cleaning Hacks : हल्ली स्वयंपाकघरात वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड हे एक साधन ठरले आहे. भाज्यांपासून ते फळांपर्यंत आणि मांसाहाराच्या कटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. मात्र, फार कमी लोकांना तो खरेदी करण्याची आणि स्टोअर करण्याची योग्य पद्धत माहीत असते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा चॉपिंग बोर्ड निवडल्यानंतर तो वापरून स्वच्छ करताना चुका होतात, ज्यामुळे जीवाणू तयार होतात आणि ते अन्नपदार्थांमध्ये पोहोचू शकतात.
जर तुम्हीही रोज चॉपिंग बोर्ड वापरत असाल किंवा नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
चॉपिंग बोर्डचा सरफेस तपासा
बाजारात चॉपिंग बोर्ड खरेदी करायला जाताना सर्वांत आधी त्याचा सरफेस पाहा. ज्या बोर्डचा सरफेस मजबूत आणि टिकाऊ असेल असाच बोर्ड निवडा. या गुणवत्तेसोबतच बोर्डची रुंदीही तपासून घ्या. मार्केटमध्ये लाकडी, बांबू आणि प्लास्टिक असे अनेक प्रकारचे बोर्ड उपलब्ध असतात. त्यापैकी प्लास्टिकचा बोर्ड न वापरण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो.
सुरीला इजा न पोहोचवणारा (नाईफ फ्रेंडली) बोर्ड निवडा
लाकडाचा कटिंग बोर्ड सुरीसाठी सर्वांत उत्तम मानला जातो. या बोर्डचा वापर केल्याने सुरीची धार लवकर कमी होत नाही. त्याउलट प्लास्टिक, काच, संगमरमर (मार्बल) किंवा स्टीलच्या बोर्डवर सुरी वापरल्यास तिची धार लवकर खराब होते.
वापरताना घ्या ही काळजी…
अनेक लोकांना चॉपिंग बोर्डवर आधी भाजी कापण्याची आणि नंतर तो न धुताच, त्यावर पनीर किंवा मटण कापण्याची सवय असते. त्यामुळे अन्नामध्ये ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’ (जीवाणूंचा संसर्ग) होतो, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे टाळण्यासाठी बोर्ड नेहमी व्यवस्थित धुऊनच दुसऱ्या कामासाठी वापरावा.
चॉपिंग बोर्ड स्टोअर करण्याची योग्य पद्धत
बोर्ड वापरल्यानंतर त्यावर अडकलेले अन्नाचे कण पूर्णपणे निघून जातील अशा रीतीने बोर्ड व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर कोमट पाण्यात डिश सोप टाकून बोर्ड धुवा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने बोर्ड पुन्हा धुऊन घ्या. बोर्ड पूर्णपणे सुकल्यानंतरच तो योग्य ठिकाणी ठेवावा.
बोर्ड कधी बदलावा?
चॉपिंग बोर्ड किती दिवसांनी बदलावा हे त्याच्या गुणवत्ता आणि तो लाकडाचा आहे की प्लास्टिकचा, यावर अवलंबून असते. प्लास्टिकचा बोर्ड एक ते दोन वर्षांच्या आत बदलावा. तर लाकडी किंवा बांबूचा बोर्ड चांगल्या गुणवत्तेचा असल्याने तो तीन ते चार वर्षांपर्यंत वापरता येतो.
