The Easiest Way To clean Silver jewellery : भारतीय महिलांच्या दागिन्यांमध्ये चांदीच्या दागिन्यांना विशेष स्थान आहे. पैंजण, पायातील जोडवी, हातातील अंगठ्या, साखळ्या, बांगड्या आणि ब्रेसलेट्स अशा विविध दागिन्यांमध्ये चांदीचा वापर केला जातो. याशिवाय, चांदीची भांडीही अनेक घरांमध्ये वापरली जातात. कालांतराने जेव्हा चांदीचे दागिने आणि भांडी काळी पडतात. तेव्हा लोक ते स्वच्छ करण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. त्यामुळे चांदीच्या दागिन्यांचे नुकसान होऊ शकते. पण, असे काही उपाय आहेत ज्या काळ्या पडलेल्या चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. चला, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अलीकडेच, ‘मास्टरशेफ इंडिया’चे माजी विजेते पंकज भदौरिया यांनी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून काळवंडलेले चांदीचे दागिने आणि भांडी स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. काळे पडलेले चांदीचे दागिने किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा घालून त्यात चांदी काही वेळ भिजत ठेवा. बेकिंग सोडा आणि मीठ चांदी व ॲल्युमिनियम यांच्यात इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होण्यास मदत करतात. चांदी काळी पडण्यास कारणीभूत असलेले सिल्व्हर सल्फाइड या प्रक्रियेदरम्यान चांदीपासून वेगळे होऊन ॲल्युमिनियमशी जोडले जाते. त्यामुळे चांदीवरील काळेपणा कमी होऊन दागिने किंवा भांडी पुन्हा स्वच्छ दिसू लागतात.
ॲल्युमिनियम फॉइल आणि बेकिंग सोडा किती प्रभावी आहे?
आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा उपाय खरोखरच काम करतो का आणि सर्व चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तो सुरक्षित आहे का? तर जयपूरस्थित पर्ल अकादमीच्या उत्पादन डिझाइन विभागाचे प्रमुख कुमार दाल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, ही पद्धत काम करते आणि त्यामागे रसायनशास्त्र आहे. पण, ते पुढे म्हणतात की, ही पद्धत सर्व चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी योग्य नाही. जेव्हा चांदी गरम पाणी, बेकिंग सोडा आणि मीठ यांच्या द्रावणातील ॲल्युमिनियम फॉइलच्या संपर्कात येते. तेव्हा ‘आयन एक्सचेंज’ नावाची एक रासायनिक प्रक्रिया घडते. ॲल्युमिनियम चांदीपेक्षा अधिक क्रियाशील आहे, त्यामुळे सल्फर चांदीऐवजी ॲल्युमिनियमशी जोडला जातो. या प्रक्रियेत, चांदीच्या पृष्ठभागावरील सल्फर ॲल्युमिनियम फॉइलवर हस्तांतरित होतो. यामुळे फॉइलवर हलके पिवळे किंवा तपकिरी डाग देखील पडू शकतात. या प्रक्रियेमुळे चांदीचे मूळ प्रमाण कमी होत नाही. तसेच, चांदीच्या धातूचा कोणताही थर निघून जात नाही. मात्र, पारंपरिक पद्धतीने चांदी पॉलिश करताना प्रत्येक वेळी तिचा अतिशय पातळ थर घासला जाऊन निघतो. त्यामुळे वारंवार पॉलिश करण्यापेक्षा ही प्रक्रिया चांदी स्वच्छ करण्यासाठी अधिक सौम्य ठरू शकते.
ही पद्धत सर्व चांदीच्या दागिन्यांवर वापरता येते का?
हो… पण, काही विशिष्ट प्रकारचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंवर हा प्रयोग करणे टाळले पाहिजे. त्या वस्तू पुढील प्रमाणे…
अँटिक चांदीचे दागिने
ऑक्सिडाइज्ड चांदीचे दागिने
सिल्व्हर-प्लेटेड वस्तू
मोती जडवलेले दागिने
ओपल
टर्कोइझ
कोरल
नाजूक डिझाइन असलेले किंवा खडे चिकटवलेले दागिने
अँटिक आणि ऑक्सिडाइज्ड चांदीवर तिचा विशिष्ट देखावा आणि डिझाइन टिकवून ठेवण्यासाठी गडद रंगाचा थर दिला जातो. ही रासायनिक प्रक्रिया हा थर काढून टाकू शकते आणि दागिन्यांचे मूळ स्वरूप बदलू शकते. यामुळे चांदीचा पातळ थर असलेल्या वस्तूंनाही नुकसान पोहोचू शकते. रासायनिक प्रतिक्रियेमुळे सिल्व्हर-प्लेटेड वस्तूंवर लहान खड्डे पडू शकतात किंवा रंगात असमान बदल होऊ शकतात.
रत्नजडित चांदीच्या दागिन्यांचे काय करावे?
उष्णता आणि हे रासायनिक द्रावण नाजूक रत्नांना नुकसान पोहोचवू शकते. मोती, ओपल, फिरोजी आणि प्रवाळ निस्तेज होऊ शकतात, त्यांना तडे जाऊ शकतात किंवा त्यांची चमक आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. रत्नांना जागेवर धरून ठेवणाऱ्या सेटिंगवरही परिणाम होऊ शकतो. ते म्हणतात की चिकटवलेली रत्ने सैल होऊ शकतात.
म्हणून, मौल्यवान, पुरातन किंवा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे हा एक सुरक्षित पर्याय आहे. तज्ज्ञ दागिन्यांचा धातू, फिनिश, रत्ने आणि पोत यावर आधारित योग्य स्वच्छता पद्धत ठरवू शकतात.
रोजच्या वापरातील चांदी कशी स्वच्छ करावी?
चांदी स्वच्छ करण्यासाठी सौम्य डिशवॉशिंग साबण आणि कोमट पाण्याचा वापर करावा. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने धुवावे आणि मऊ कापडाने पूर्णपणे कोरडे करावे. जर काळपटपणा किंवा डाग राहिले, तर चांदी पॉलिश करण्याचे कापड किंवा त्या प्रकारच्या चांदीसाठी शिफारस केलेले विशेष सिल्व्हर क्लीनर वापरणे आवश्यक आहे. ॲल्युमिनियम फॉइल, बेकिंग सोडा आणि मीठ ही पद्धत काही साध्या चांदीच्या वस्तूंवर वापरली जाऊ शकते. पण, जर दागिन्यांमध्ये रत्ने जडवलेली असतील, विशेष फिनिश असेल, सिल्व्हर प्लेटेड असेल, पुरातन असेल किंवा महाग असेल, तर ही पद्धत टाळावी.
