Helmet Care In Rainy Season Hacks : रस्त्यावरुन दुचाकी चालवताना सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणं गरजेचे आहे. परंतु पावसाळ्यात हेल्मेट वापरणं थोडं त्रासदायक असते. कारण ओल्यामुळे हेल्मेटच्या आतून खूप दुर्गंधी येते. ओलावा, घाम, आणि हेल्मेट व्यवस्थित न सुकल्यामुळे त्यात जिवाणू, बुरशी वाढण्यास पोषक वातावरण मिळते. यामुळे हेल्मेट नीट न सुकल्यास त्यातून तीव्र कुबट वास आणि दुर्गंधी येते. वेळीच ते नीट स्वच्छ केले नाही तर टाळू आणि केसांच्या समस्या वाढू लागतात. पण तुम्ही काही सोप्या पद्धतीने पावसाळ्यात हेल्मेट अगदी स्वच्छ ठेवू शकता.

हेल्मेटचे पॅड आणि लायनर करा स्वच्छ

हेल्मेटच्या आतील पॅड किंवा लायनर निघत असल्यास, तो कोमट पाण्यात सौम्य साबण किंवा शॅम्पू मिसळून धुवा. तो पूर्णपणे सुकल्यानंतरच पुन्हा लावा. पॅड ओला असताना पुन्हा लावल्यास दुर्गंधी वाढू शकते. ज्या हेल्मेट्सचे लायनर काढता येत नाहीत, ते हलक्या ओलसर मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा आणि नंतर कोरड्या कापडाने ओलावा पुसून टाका.

ओले हेल्मेट लगेच तसेच डिक्कीत ठेवू नका

पावसात हेल्मेट ओले झाल्यास, ते लगेच बॅग, कपाट किंवा बाईकच्या डिक्कीत ठेवू नका. आधी, ते मोकळ्या, हवेशीर जागेत पूर्णपणे सुकू द्या. यामुळे ओलावा साचणार नाही आणि जिवाणूंच्या वाढीचा धोका कमी होईल. मात्र हेल्मेट जास्त वेळ थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा, कारण यामुळे बाहेरील थर आणि आतील फोम खराब होऊ शकतो.

सॅनिटायझर स्प्रे वापरा

हेल्मेटच्या आतील दुर्गंधी कमी करण्यासाठी हेल्मेट सॅनिटायझर स्प्रेचा वापर केला जाऊ शकतो. जर हे उपलब्ध नसेल, तर सौम्य अँटीबॅक्टेरियल स्प्रेचा वापर देखील मर्यादित प्रमाणात केला जाऊ शकतो. तीव्र सुगंधाचे परफ्यूम किंवा डिओडोरंट थेट हेल्मेटच्या आत फवारणे टाळा, कारण यामुळे आतील फोमला नुकसान पोहोचू शकते.

डोक्याची आणि केसांची करा स्वच्छता

हेल्मेट घालण्यापूर्वी आपले केस आणि डोके स्वच्छ ठेवा. ओल्या केसांनी किंवा जास्त घामाने हेल्मेट घातल्यास आतमध्ये ओलावा अडकून राहू शकतो. इच्छित असल्यास, सुती हेल्मेट कॅप घालण्याचा विचार करा. ही टोपी घाम शोषून घेते आणि हेल्मेटचे अस्तर खराब होण्यापासून वाचवते.

हेल्मेट दर आठवड्याला तपासा

जर तुम्ही हेल्मेट रोज वापरत असाल, तर ते आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करायला विसरू नका. तसेच वेळोवेळी पॅड्सची स्थिती तपासा. जर पॅड्स खूप जुने झाले असतील, फाटले असतील किंवा त्यातून सतत दुर्गंध येत असेल, तर ते बदलणे गरजेचे आहे.