How to clean Stomach: हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या खूप लोकांना होते, कारण या काळात शरीराची हालचाल कमी होते आणि पाण्याचे सेवनही कमी होते. ऑक्टोबरपासूनच अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. थंडीमुळे लोक पुरेसं पाणी पित नाहीत, त्यामुळे पचन मंदावते आणि आतड्यांची हालचाल कमी होते. याशिवाय, हिवाळ्यात जड, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात, ज्यामुळे पोटात गॅस, ब्लोटिंग आणि त्रास होतो.

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी रोज कोमट पाणी पिणे आणि फायबरयुक्त अन्न खाणे महत्त्वाचे आहे, जसे ओट्स, हिरव्या भाज्या, फळे आणि डाळी. सकाळी थोडं चालणं किंवा योगा केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. पुरेशी झोप घेणे आणि ताण टाळणेही गरजेचे आहे, कारण यांचा पचनावर थेट परिणाम होतो. योग्य आहार आणि जीवनशैली पाळल्यास हिवाळ्यातील बद्धकोष्ठतेची समस्या सहज कमी होऊ शकते.

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही घरगुती उपायही उपयोगी ठरतात. प्रसिद्ध योगी आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात की एक निरोगी माणसाचे शरीर सकाळी उठल्यानंतर काही मिनिटांत नैसर्गिकरित्या स्वच्छ होते. जर उठल्यावर २० मिनिटांच्या आत आपले आतडे आपोआप साफ होत नसेल, तर याचा अर्थ शरीरात काही बिघाड आहे किंवा एखादी लपलेली समस्या असू शकते.

सद्गुरूंच्या मते, जेव्हा शरीराचा नैसर्गिक रिदम बिघडतो आणि रोज पोट साफ होत नाही, तेव्हा ते बद्धकोष्ठतेचे लक्षण असते. पुढे जाऊन ही समस्या अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. म्हणून प्रत्येकाने आपले पचनस्वास्थ्य चांगले ठेवायला हवे त्यामुळे सकाळी नैसर्गिकरित्या शौच होईल.

सद्गुरू यांनी सांगितला बद्धकोष्ठतेवरील उपचार

सद्गुरू सांगतात की जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता होत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधात एक चमचा एरंडेल तेल मिसळून प्या. आयुर्वेदानुसार, एरंडेल तेल हे एक शक्तिशाली नैसर्गिक रेचक मानले जाते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून आतडे स्वच्छ करते.

एरंडेलच्या तेलात असलेले रिसिनोलिक अ‍ॅसिड आतड्यांच्या स्नायूंना चालना देते. त्यामुळे आतड्यांची आकुंचन-विस्तार प्रक्रिया वेगाने होते. यामुळे पोटात आणि आतड्यांत साठलेला मल सहज बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठता असेल तर पटकन आराम मिळतो. आयुर्वेदनुसार हे तेल वात दोष संतुलित करते, कारण बद्धकोष्ठता ही वात वाढल्यामुळे होते. गरम दुधासोबत थोड्या प्रमाणात एरंडेलचे तेल घेतल्यास पचन सुधारते, आतडे सक्रिय राहतात आणि शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ (डिटॉक्स) होते.

सद्गुरूंच्या मते एरंडेलचे तेल फक्त बद्धकोष्ठता कमी करत नाही, तर पोट फुगणे आणि गॅसची समस्या यांनाही आराम देते. हे तेल शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया सक्रिय करते आणि पचन तंत्र संतुलित ठेवते. सद्गुरू म्हणतात की शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आतडी निरोगी ठेवण्यासाठी अधूनमधून एरंडेलचे तेल घेणे फायदेशीर असते. हे तेल मलाशय साफ करते, आतड्यांत साचलेला कचरा बाहेर काढते आणि संपूर्ण पचन तंत्र हलके व सक्रिय ठेवते.