How to clean Stomach: इसबगोलमध्ये भरपूर फायबर असतं. प्राचीन काळापासून याचा वापर केला जातो. पोट बिघडलं असेल किंवा पोटदुखी होत असेल तर अनेकजण इसबगोल खातात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यासोबतच आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही याची मदत होऊ शकते. मात्र, याचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेणं महत्त्वाचं आहे. इसबगोल वेगवेगळ्या प्रकारे खाता येतो. तेच प्रकार आज आपण जाणून घेणार आहोत.

इसबगोल म्हणजे काय?

इसबगोल प्लांटागो ओव्हाटा या वनस्पतीच्या बियांच्या सालीपासून तयार केला जातो. यात भरपूर प्रमाणात विरघळणारं फायबर असतं. हे फायबर पाण्यात मिसळल्यावर जेलसारखं होतं. त्यामुळे ते पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतं.

पाण्यात मिसळून प्या

इसबगोल घेण्याची ही सर्वात जुनी आणि सोपी पद्धत आहे. एका ग्लास पाण्यात 2 चमचे इसबगोल मिसळून प्या. त्यानंतर आणखी एक ग्लास साधं पाणी प्या. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.

दह्यासोबत खा

जर तुम्हाला इसबगोल पाण्यासोबत प्यायला आवडत नसेल, तर तो दह्यात मिसळून खाऊ शकता. दह्यासोबत खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. एका वाटी दह्यात अर्धा चमचा इसबगोल मिसळून खाऊ शकता.

दुधासोबत घ्या

रोज रात्री दुधासोबत इसबगोल घेणंही फायदेशीर ठरू शकतं. काही लोक कोमट दुधात इसबगोल मिसळून पितात. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, इसबगोलचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे.

स्मूदी किंवा ओट्समध्ये मिसळा

इसबगोल चविष्ट पद्धतीने खायचा असेल तर तो स्मूदी, ओट्स किंवा दलियामध्ये मिसळून खाऊ शकता. त्यामुळे फायबरचं प्रमाण वाढतं आणि चवही चांगली लागते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)