How to Clean Stomach Naturally: सकाळी उठल्यानंतरही पोट व्यवस्थित साफ होत नाही? दिवसभर पोट जड राहणे, सतत गॅस होणे, पोट फुगणे व शौचाला त्रास होणे अशा समस्यांमुळे अनेक जण त्रस्त असतात. काही जण या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी वारंवार औषधांचा आधार घेतात. मात्र, आपल्या रोजच्या आहारातील काही साध्या गोष्टी पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी मदत करू शकतात. योगगुरू बाबा रामदेव यांनीही पोटाच्या आरोग्यासाठी काही नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी काही पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतात. जाणून घेऊया हे नेमके कोणते पदार्थ आहेत.
पोट साफ होण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
१. नाशपातीचा आहारात करा समावेश
पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर नाशपाती हे फळ आहारात समाविष्ट करता येईल. नाशपातीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास आणि मल मऊ होण्यास मदत होऊ शकते. नाशपाती सालीसह व्यवस्थित धुऊन खाल्ल्यास अधिक फायबर मिळते.
२. मुळा खाणे फायदेशीर
मुळा केवळ चवीसाठीच नव्हे, तर पचनाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. मुळ्यामध्ये पाणी आणि फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. कच्चा मुळा सलाडच्या स्वरूपात किंवा जेवणासोबत खाऊ शकता.
३. पेरू, पपई व डाळिंबसेवनाला महत्त्व
पोटाच्या तक्रारी कमी करायच्या असतील, तर फळांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पेरू आणि पपईमध्ये फायबर असते. त्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते. डाळिंबाचाही संतुलित आहारात समावेश करता येतो. मात्र, बद्धकोष्ठतेसाठी फायबरयुक्त फळांचे सेवन आणि पुरेसे पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे.
४. इसबगोल ठरू शकतो मदतनीस
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी इसबगोल हा एक पर्याय आहे. इसबगोलमध्ये विरघळणारे फायबर असते. ते पाणी शोषून मलाचे प्रमाण वाढवते आणि मल मऊ करण्यास मदत करते. रात्री किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इसबगोल पुरेशा पाण्यासोबत घ्यावा. इसबगोल घेताना दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
५. पिकलेली केळी आणि सफरचंद
पिकलेली केळी आणि सफरचंद यांचाही रोजच्या आहारात समावेश करता येतो. या दोन्ही फळांमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनसंस्था तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. विशेषतः सफरचंद सालीसह खाल्ल्यास शरीराला फायबर मिळते.
६. कोरफड आणि आवळ्याच्या रसाबाबत काय?
कोरफड आणि आवळ्याचा रस हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे अनेकदा सांगितले जाते. मात्र, कोरफडीचा रस बद्धकोष्ठतेवर प्रभावी उपाय आहे किंवा तो आतड्यांची स्वच्छता करतो, असे मानून स्वतःहून सेवन करू नये. काही प्रकारच्या कोरफडीमुळे पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात. आवळ्याचा आहारात समावेश करता येतो; मात्र त्याला बद्धकोष्ठतेवरील हमखास उपचार समजू नये. डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच करा.
जेवताना टाळा ‘या’ छोट्या चुका!
पोटाच्या तक्रारींचा संबंध केवळ तुम्ही काय खाता याच्याशी नसतो, तर तुम्ही कसे खाता याच्याशीही असतो. घाईघाईने जेवणे, अन्न व्यवस्थित न चावणे आणि जेवताना सतत मोबाईल पाहणे अशा सवयी तुमचे पचन बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
बाबा रामदेव यांनीही जेवणाचा निवांतपणे आनंद घेत व्यवस्थित चावून खाण्यावर भर दिला आहे. कारण- अन्न नीट चावले गेले, तर पचनाची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होण्यास मदत होते. त्यामुळे जेवताना घाई करणे टाळा.
त्रिफळा चूर्णाचा वापर फायदेशीर?
आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्णाचा वापर पचनाशी संबंधित तक्रारींसाठी केला जातो. काही लोक बद्धकोष्ठतेसाठीही त्याचा वापर करतात. मात्र, प्रत्येकाला त्याचा सारखाच फायदा होईल, असे नाही. त्याचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळी प्या जिरे, बडीशेप किंवा धण्याचे पाणी!
पचन सुधारण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जिरे, बडीशेप आणि धण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. या पदार्थांपासून तयार केलेले पाणी काही जणांसाठी पोट फुगणे किंवा अपचनाच्या त्रासामध्ये आरामदायी ठरू शकते.
पोटाच्या तक्रारी वाढण्यामागे कोणती कारणे?
पोट व्यवस्थित साफ न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आहारात फायबरची कमतरता, दिवसभर पुरेसे पाणी न पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा, सततचा मानसिक ताण आणि अपुरी झोप यांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. त्याशिवाय काही औषधांमुळेही शौचास त्रास होऊ शकतो.
त्यामुळे चयापचय क्षमता उत्तम ठेवायची असेल, तर केवळ एखाद्या पदार्थावर किंवा घरगुती उपायावर अवलंबून राहू नका. रोजच्या आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. पुरेसे पाणी प्या, नियमित व्यायाम करा आणि शौचाची इच्छा दाबून ठेवू नका. बद्धकोष्ठतेचा त्रास दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा पोटदुखी, उलट्या, मलातून रक्त जाणे अथवा अचानक वजन कमी होणे, अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
