How to Clean Stomach Naturally: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोटाच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अपचन, गॅस, पोट फुगणे किंवा अनेक दिवसांपासून चालू असलेला बद्धकोष्ठतेचा त्रास अशा समस्या अनेकांना सतावत आहेत. औषधं घेऊनही आराम मिळत नसेल, तर योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
बाबा रामदेव सांगतात की, पोट पूर्णपणे साफ राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून न राहता खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित दिनचर्या यामुळे पचनसंस्था नैसर्गिकरीत्या सक्षम होते.
पोट स्वच्छ करण्यासाठी काय खावे?
बाबा रामदेव यांच्या मते, नाशपाती हा बद्धकोष्ठतेवर अतिशय प्रभावी उपाय आहे. नाशपाती हळूहळू, नीट चावून खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. पोट नीट साफ होत नसेल तर नाशपातीचा समावेश रोजच्या आहारात करावा.
- मुळा यकृत, पोट आणि आतड्यांसाठी लाभदायक मानला जातो. कच्चा मुळा खाल्ल्यास आतड्यांची चांगली सफाई होते.
- तसेच पेरू, पपई आणि डाळिंब या फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोट लवकर मोकळे होते.
- रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात इसबगोल मिसळून प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. इसबगोल हा पोटाच्या तक्रारींवर अत्यंत परिणामकारक मानला जातो.
- पिकलेली केळी आणि सफरचंद हे तंतूमय घटकांनी समृद्ध असल्याने मल मऊ होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते.
- ज्यांना दीर्घकाळापासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी सकाळी उपाशीपोटी कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस सेवन करावा. हे दोन्ही रस आतड्यांची स्वच्छता करतात आणि जुनाट बद्धकोष्ठतेवर प्रभावी ठरतात.
जेवताना अशी काळजी घ्या
बाबा रामदेव यांचा सल्ला आहे की जेवण कधीही घाईघाईने करू नये. अन्न नीट चावून खाल्ल्यास लाळेचे प्रमाण वाढते, अन्नाचे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.
त्रिफळा ठरेल उपयुक्त
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. त्रिफळा आतड्यांची सफाई करून पचनसंस्था सक्रिय ठेवते.
मसाल्यांचे पाणी प्या
सकाळी उपाशीपोटी जिरे, बडीशेप किंवा धणे उकळून तयार केलेले पाणी प्यायल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतात आणि पचन सुधारते.
पोटात घाण साचण्याची कारणे
मैद्यापासून तयार केलेले पदार्थ, अपुरी पाण्याची मात्रा, उशिरा आणि जड जेवण, अतिप्रमाणात गोड व तिखट-तळलेले पदार्थ, शारीरिक हालचालींचा अभाव, सततचा मानसिक ताण, अपुरी झोप आणि दीर्घकाळ औषधांचे सेवन या सर्व कारणांमुळे पोटात घाण साचते.
पोट स्वच्छ ठेवायचे असेल तर केवळ औषधांवर विसंबून न राहता नैसर्गिक आहार, योग्य सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. बाबा रामदेवांचे हे उपाय नियमितपणे केल्यास पोटाच्या अनेक तक्रारींपासून कायमचा दिलासा मिळू शकतो.
