3 Tips to Control Sleepiness Post Lunch at Work : ऑफिसमध्ये तुम्ही अनुभवलं असेल की, सकाळपासून व्यवस्थित काम करतो; पण दुपारी जेवल्यानंतर अशी काय झोप येत असते की, जी रोखू शकत नाही. काम करताना अशी सुस्ती येते की, डोळे अक्षरश: बंद होऊ लागतात. कामात मन लागत नाही. कोणी काय काम करायला सांगितलं की, आपण उत्तर देतो, “आता नको, नंतर करतो, मी आताच जेवलो आहे.” पण, हा केवळ एका व्यक्तीचा अनुभव नाही तर तो अनेकांचा अनुभव आहे. दुपारचे जेवण झाल्यावर कॉम्प्युटरची स्क्रीन धूसर दिसू लागते. जणू काही त्याच क्षणी संपूर्ण जग झोपी गेले आहे, असे वाटते. पण असं नेमकं का होतं यामागे कारण आणि उपाय काय ते जाणून घेऊ…

दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे अन्न. खरं तर जेव्हा लोक पोटभर जेवतात, तेव्हा त्यांचे शरीर आपली सर्व ऊर्जा ते पचवण्यासाठी वापरते. त्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि सर्व लक्ष पोटावर केंद्रित होते. त्याशिवाय जर तुम्ही दुपारच्या जेवणात जास्त भात, ब्रेड किंवा गोड पदार्थ खाल्ले असतील, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर वेगाने कमी होते, ज्यामुळे तुम्हाला सुस्ती येते. म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागते.

तुमच्या आहारात काय बदल करावा?

जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल, तर सुस्ती आणि झोप येणे टाळण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे दुपारच्या जेवणात जास्त भात किंवा जड पराठे खाणे टाळणे. त्याऐवजी डाळी, भाज्या आणि सॅलडला प्राधान्य द्या. पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवा. हलके जेवण केल्याने तुमच्या शरीराला पचनासाठी कमी मेहनत करावी लागेल आणि तुम्हाला कमी आळस जाणवेल.

Award Banner

१० मिनिटे चाला

जेवणानंतर लगेच खुर्चीत बसू नका. जेवणानंतर ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये किंवा बाहेर १० मिनिटे फिरा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि मेंदूला ताजा ऑक्सिजन मिळतो. या लहानशा फिरण्यामुळे तुम्हाला तुमचा आळस दूर करण्यास मदत होईल.

बरेच लोक दुपारच्या जेवणानंतर पाणी प्यायला विसरतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) आणि थकवा जाणवतो. म्हणून जेवणानंतर लगेचच एक-दोन ग्लास पाणी प्या. तसेच, जर तुमच्या ऑफिसमध्ये कमी प्रकाश असेल, तर भरपूर प्रकाश असलेल्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा किंवा शक्य असल्यास सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी जा. अन्नाव्यतिरिक्त अपुरा प्रकाशदेखील झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकते .

स्ट्रेचिंग करा

एवढं सगळं करूनही तुम्हाला झोप येत असेल, तर तुमच्या जागेवरून उठा. हात डोक्यावर ताणा आणि शरीराला थोडे स्ट्रेच करा. डोळ्यांवर थोडे थंड पाणी शिंपडा किंवा एखाद्या सहकाऱ्याशी दोन मिनिटे बोला. ही छोटीशी मानसिक विश्रांती तुमच्या मेंदूला पुन्हा सक्रिय करण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करू शकाल.