Air Fryer Cleaning Hacks : आजकाल घराघरांमध्ये एयर फ्रायरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कधी यात फ्रेंच फ्राईज बनवले जातात; तर कधी पनीर टिक्का, कटलेट आणि इतर पौष्टिक पदार्थ. त्यामध्ये जेवण बनवण्यासाठी खूपच कमी तेल लागते; पण याचा अर्थ असा नाही की, एयर फ्रायर घाण होत नाही. वारंवार वापरल्यामुळे त्याच्या बास्केटमध्ये तेल आणि अन्नाचे बारीक तुकडे चिकटतात. बऱ्याचदा आतील भागात आणि हीटिंग कॉईलवरही तेल साचते. जर वेळच्या वेळी याची स्वच्छता केली नाही, तर पुढील वेळी जेवण बनवताना अडचणी येऊ शकतात. चला तर मग, जाणून घेऊया एअर फ्रायर अगदी सोप्या पद्धतीने कसा स्वच्छ करावा.

१. एयर फ्रायरचे बास्केट स्वच्छ कसे करायचे?

एयर फ्रायर साफ करण्यासाठी सर्वांत आधी त्याची बास्केट बाहेर काढा. त्यात उरलेले अन्न बाहेर काढून टाका आणि बास्केट पूर्णपणे थंड होऊ द्या. कधीही गरम बास्केट ताबडतोब धुण्याचा प्रयत्न करू नका. आता टिश्यू पेपर किंवा किचन पेपरच्या मदतीने बास्केटमध्ये साचलेले तेल आणि चिकटपणा पुसून घ्या. त्यानंतर त्यात थोडे कोमट पाणी आणि थोडेसे भांडी धुण्याचे लिक्विड (साबण) टाका. हे मिश्रण सुमारे ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे चिकटलेले तेल नरम होईल आणि बास्केट साफ करणे अतिशय सोपे होईल.

२. बास्केटची कोटिंग खराब होण्यापासून वाचवा

३० मिनिटे झाल्यानंतर बास्केट एका मऊ स्पंजने स्वच्छ करा. हलक्या हाताने घासून घ्या, जेणेकरून चिकटलेले तेल आणि अन्नाचे कण निघून जातील. त्यासाठी कधीही खूप खडबडीत स्क्रबर किंवा स्टीलच्या घासणीचा वापर करू नका. एअर फ्रायरच्या बास्केटवर नॉन-स्टिक कोटिंग असते. जोरात घासल्यामुळे किंवा धारदार वस्तूंनी साफ केल्यास त्यावर ओरखडे (स्क्रॅचेस) येऊ शकतात. जर कडांवर अजूनही तेल चिकटले असेल, तर ओल्या मऊ कपड्याने ते हळूच पुसून घ्या. शेवटी स्वच्छ पाण्याने धुऊन बास्केट पूर्णपणे कोरडी करून घ्या.

३. एअर फ्रायरच्या आतील भाग असा करा स्वच्छ

बास्केट साफ केल्यानंतर एअर फ्रायरच्या आतील भागाची स्वच्छता करा. त्यासाठी सर्वांत आधी मशीनचा प्लग काढा. स्वच्छता सुरू करण्यापूर्वी एअर फ्रायर पूर्णपणे थंड झाल्याची खात्री करा. आता एक मऊ कापड घ्या आणि ते हलकेसे ओला करा. त्यावर थोडेसे भांडी धुण्याचे लिक्विड लावून आतील भिंती हळुवार पुसून घ्या. जिथे तेल साचले असेल, ती जागा काळजीपूर्वक साफ करा. त्यानंतर दुसऱ्या स्वच्छ आणि ओल्या कपड्याने पुन्हा एकदा पुसून घ्या, जेणेकरून साबण आत राहणार नाही. एअर फ्रायर पुन्हा वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे सुकू द्या.

४. हीटिंग कॉईलची स्वच्छता

एयर फ्रायरच्या आत वरच्या बाजूस हीटिंग कॉईल असते. जेवण बनवताना तेलाचे शिंतोडे त्यावरही उडतात. ही साफ करण्यापूर्वी मशीनचा प्लग काढून ती पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहा. आता हीटिंग कॉईलपर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून एअर फ्रायर काळजीपूर्वक उलटा करा. मऊ ब्रश, स्पंज किंवा हलक्या ओल्या कपड्याने त्याच्या आसपास साचलेले तेल साफ करा.

५. बाहेरूनही एअर फ्रायर स्वच्छ करा

एअर फ्रायरच्या बाहेरील बॉडीवर बोटांचे उमटलेले डाग, तेल आणि धूळ साचते. हे साफ करण्यासाठी एक मऊ कापड घ्या. तो हलक्या साबणाच्या पाण्यात ओला करून चांगला पिळून घ्या. आता या कपड्याने एअर फ्रायरचा बाह्य पृष्ठभाग पुसून घ्या. त्यानंतर एका स्वच्छ आणि कोरड्या कापड्याने पुन्हा एकदा पुसून घ्या. स्वच्छता करताना पाणी मशीनच्या बटणांवर, विजेच्या भागांवर किंवा कोणत्याही उघड्या छिद्रात जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.

एअर फ्रायर किती वेळा साफ करावा?

  • बास्केट आणि क्रिस्पर प्लेट: प्रत्येक वापरा नंतर साफ करा.
  • आतील भाग: तेल किंवा चिकटपणा दिसल्यास कपड्याने पुसून घ्या.
  • हीटिंग कॉईल: गरज भासेल तेव्हा ती तपासून साफ करा.
  • डीप क्लीनिंग: तुम्ही एअर फ्रायरचा जितका वापर करता, त्यानुसार वेळोवेळी त्याची डीप क्लिनिंग करा.

एअर फ्रायर साफ करताना कोणती काळजी घ्यावी? (काय करू नये?)

  • एअर फ्रायरची मुख्य युनिट कधीही पाण्यात बुडवू नका.
  • स्टीलची घासणी किंवा कठोर स्पंज वापरणे टाळा.
  • हीटिंग कॉईलवर थेट पाणी ओतू नका.
  • गरम बास्केट लगेच धुऊ नका, ती थंड होण्याची वाट पाहा.
  • पूर्णपणे सुकल्याशिवाय मशीन चालू करू नका.
  • रिकाम्या बास्केटमध्ये पार्चमेंट पेपर ठेवून, एअर फ्रायर कधीही चालवू नका.