श्रावण महिना आला की एका पाठोपाठ एक सणांची रेलचेल असते. अशावेळी सणाच्या निमित्ताने देवाला नैवद्य दाखवण्याची पद्धत असते. महाराष्ट्रातील नैवेद्यात ओल्या खोबऱ्याचा आवर्जून वापर केला जातो. विशेषतः कोकण पट्ट्यात जेवणाच्या जवळपास सर्वच पदार्थात खोबरे वापरले जाते. येत्या काही दिवसात घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होईल. गणरायाचा आवडीचा खाऊ म्हणजे मोदक. उकडीचे मोदक करताना त्यात खोबऱ्याचे गोड सारण भरले जाते. हे खोबऱ्याचे पदार्थ खाताना कितीही चविष्ट वाटत असले तरी नारळाची कवड खवणे हे काही साधे काम नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रचंड वेळखाऊ असे हे काम करताना कितीही मेहनत घेतली तरी थोडं खोबरं करवंटीला चिकटून वायाच जातं, आज आपण काही छोटे उपाय पाहणार आहोत ज्याने खोबरं बिल्कुल वाया न घालवता आपण पूर्ण वापरू शकाल.

ट्रिक १: नारळाच्या खालील बाजूला तीन डोळे असतात, यातील एक डोळा हा नरम असतो. सर्वात आधी घरातील एका टोकदार वस्तूने किंवा चमच्याच्या टोकाने होल करून घ्या. यातून नारळाचे पाणी बाहेर काढून घ्या जेणेकरून नारळ आतून पोकळ होईल. यानंतर नारळ आडवा धरून त्याला गोल फिरवत वरवंटा किंवा दगडाने मारायचे आहे. नारळाला तीन गडद रंगाच्या रेषा असतात. आपल्याला या रेषांच्या मधोमध मारायचे आहे, नारळाचे दोन तुकडे झाल्यावर त्याला दहा मिनिट फ्रीजर मध्ये ठेवा व मग चमच्याने कडा सोडवून घ्या. यामुळे करवंटीला खोबरं चिकटून राहत नाही.

ट्रिक २: आपल्याला उद्याच्या दिवशी जर काही बेत करायचा असेल तर आपण आदल्या दिवशी नारळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. निदान १२ तासाने नारळ बाहेर काढून वरवंट्याने मारून वरील करवंटी फोडून बाजूला करा. आपल्याला हा नारळाचा पूर्ण खोबळा काढता येईल. नंतर आपण काप करून किंवा थेट किसून खोबरे जेवणात वापरू शकाल.

शास्त्र असतं ते! नैवेद्याचं पान वाढताना कशी असावी मांडणी? जाणून घ्या

ट्रिक ३: आपल्याला नारळात पहिल्या ट्रिक प्रमाणे एक होल करायचा आहे. यामध्ये स्क्रूड्राइव्हर किंवा लांब पलिता अडकवून हा नारळ गॅसवर ठेवा. थोड्यावेळाने नारळाला तडा गेल्याचे दिसेल. आता आपण वरवंट्याने मारून करवंटी वेगळी करून घ्या.

या तिन्ही टिप्सने आपल्याला करवंटीला न चिकटता पूर्ण खोबरे मिळेल. खोबरे वापरताना आपण त्यावरची चॉकलेटी रंगाची त्वचा सुद्धा सोलून काढू शकता. यामुळे जेवणात वापरताना खोबऱ्याचा कडवटपणा नाहीसा होईल. हे उपाय तुम्हाला कामी आल्यास आम्हाला कळवायला विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get more khobre or copra without wasting in coconut shell check kitchen tips svs
First published on: 12-08-2022 at 16:50 IST