PNG Gas Connection Online Process : केंद्र सरकारकडून देशभरात गॅस नेटवर्कचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे, त्याचाच भाग म्हणून एकाच इंधनावर अवलंबून असलेल्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्राने एक नवीन धोरण आणलं आहे, ज्यानुसार ज्या भागांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) उपलब्ध आहे, तेथील लोकांनी पीएनजीचा वापर सुरू न केल्यास त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते.

मध्य पूर्वेतील संकटामुळे जागतिक तेल पुरवठ्यात मोठा परिणाम झाला आहे, यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकार घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी पीएनजीला अधिक विश्वासार्ह पर्याय म्हणून प्रोत्साहन देत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने २०२६ मध्ये हा आदेश जारी केला आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पीएनजीमुळे गॅसचा अखंड पुरवठा होतो, यामुळे गॅस सिलिंडरवर अवलंबून राहावे लागत नाही. अशाने ऊर्जा सुरक्षा वाढेल आणि सिलिंडर पुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल.

Award Banner

PNG कनेक्शन मिळवण्यासाठीची प्रोसेस

१) तुमच्या स्थानिक गॅस कंपनीच्या (जसे की IGL किंवा MGL) वेबसाइटला भेट द्या.
२) “New PNG Connection” सेक्शनमध्ये जा
३) आता तुमची माहिती आणि पत्ता भरा.
४) आवश्यक कागदपत्रे (जसे की आधार, पत्त्याचा पुरावा) अपलोड करा.
५) फी जमा करा.
६) अर्ज सबमिट करा आणि रेफरन्स नंबर नोंदवून घ्या.
७) यानंतर कंपनी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करून इन्स्टॉलेशनची तारीख निश्चित करेल.

पीएनजी कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे

१) ओळखपत्र (कोणतेही एक): आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना.
२) पत्त्याचा पुरावा (यापैकी कोणताही एक) : वीज बिल, बीएसएनएल बिल, रेंट ॲग्रिमेंट, रेशन कार्ड किंवा मालमत्ता कराची पावती.
३) मालकीचा पुरावा : मालमत्तेची कागदपत्रे, सोसायटीचे पत्र, शेअर प्रमाणपत्र किंवा कर पावती.
४) भाडेकरूसाठी : घरमालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि त्याची कागदपत्रे.
५) इतर : पासपोर्ट साईज फोटो.

दरम्यान, कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जागेची पाहणी केली जाते. त्यानंतर सुरक्षा तपासणीसह पाईपलाईन आणि मीटर बसवण्याचे काम केले जाते. ज्या भागांमध्ये आधीपासून पाईपलाईन आहेत, तिथे कार्यान्वित होण्यास ७-१५ दिवस लागू शकतात, तर नवीन भागांना अधिक वेळ लागू शकतो.

बचत आणि सोयीचे गणित

पीएनजी आणि एलपीजी यांची तुलना करता पीएनजी खूप किफायतशीर आहे. एलपीजीमध्ये तुम्हाला सिलिंडरचे आगाऊ पैसे द्यावे लागतात, तर पीएनजी वापरानुसार पैसे द्यावे लागतात. शिवाय पीएनजीमध्ये सिलिंडर फुटण्याचा आणि गळतीचा धोका फार नगण्य असतो, कारण त्याचा दाब खूप कमी ठेवला जातो.

पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन वापरू शकतो का?

सध्या सरकार एकाचवेळी दोन्ही कनेक्शन चालू ठेवण्यास परवानगी देत आहे, त्यामुळे बरेच लोक बॅकअप म्हणून सिलिंडर ठेवतात. पण, आता पीएनजीकडे वळणे हे सरकारचे धोरण आहे.