Bad Breath Remedies : कोणाशी बोलताना तोंडाची दुर्गंधी येऊ लागली की अनेकदा आपल्याला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक खिशात बडीशेप बाळगतात, तर काही जण मिंट कॅंडी किंवा माउथ फ्रेशनरचा वापर करतात. या गोष्टी काही वेळासाठी श्वास ताजेतवाने करू शकतात, परंतु प्रत्येक पर्याय दातांसाठी चांगलाच असेल असे नाही. विशेषतः गोड पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे दातांमध्ये किड लागण्याचा (कॅविटी) धोका वाढू शकतो. अशा वेळी तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी नेमके काय खाल्ले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. डेंटिस्ट डॉ. श्रेया केडिया यांच्याकडून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
१. साधी बडीशेप
जेवणानंतर बडीशेप खाणे अनेकांना आवडते. बडीशेपेचा सुगंध तोंडाची दुर्गंधी काही वेळासाठी कमी करण्यास मदत करतो. ती चघळल्यामुळे तोंडात लाळ देखील तयार होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या कमी होऊ शकते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की, बडीशेप ही साधी असावी आणि त्यावर साखरेचा थर नसावा.
२. साधी वेलची
वेलचीचा सुगंध खूप छान असतो. त्यात असणारे नैसर्गिक घटक (नॅचरल ऑइल) श्वासाची दुर्गंधी काही वेळेसाठी लपवण्यास मदत करू शकतात. जेवणानंतर एक साधी वेलची चघळणे हा एक अगदी सोपा उपाय आहे. मात्र, साखरेच्या पाकातली वेलची वापरण्याऐवजी नेहमी साधी वेलचीच निवडा.

३. खायचे पान
पानात स्वतःचा एक वेगळा आणि खास सुवास असतो. ते चघळल्याने काही वेळासाठी तोंडाची दुर्गंधी कमी जाणवते. परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की, गोड पान किंवा सुपारी घातलेले पान देखील चांगला पर्याय आहे.
४. शुगर-फ्री च्युइंग गम
जर तुम्हाला जेवणानंतर तोंड फ्रेश करायचे असेल, तर शुगर-फ्री च्युइंग गम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ते चघळल्यामुळे तोंडात लाळ निर्माण होण्यास मदत होते, ज्यामुळे तोंडाचा कोरडेपणा कमी होतो. ही लाळ अन्नाचे बारीक कण आणि ॲसिड काढून टाकण्यासही मदत करते. फक्त लक्षात ठेवा की, च्युइंग गम नेहमी शुगर-फ्री असावी. पण हे ब्रश करण्याच्या किंवा दातांच्या स्वच्छतेचा पक्का पर्याय नाही.

५. लवंग
लवंगेचा उग्र सुवास तोंडाची दुर्गंधी काही वेळासाठी दूर करू शकतो. यामध्ये ‘युजेनॉल’ नावाचे एक तत्त्व असते, ज्यामध्ये जिवाणूंच्या (बॅक्टेरिया) विरोधात लढण्याचे गुणधर्म असतात. पण लवंग खूप जास्त वेळ चघळल्यामुळे तोंडात जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्या.

६. ताजा पुदिना
पुदिन्यातील मेन्थॉलमुळे तोंडात थंडावा जाणवतो, त्याच्या सुगंधामुळे श्वासातील दुर्गंधी दूर होते तसेच थोडे फ्रेश वाटते. तुम्ही पुदिन्याची पानं थेट चावून खाऊ शकता किंवा पुदिना घातलेले पाणी पिऊ शकता. पण हा तोंडातील दुर्गंधी रोखण्याचा कायमचा उपाय नाही, त्यामुळे त्याचे मूळ कारणं शोधणे महत्त्वाचे आहे.
(टीप – कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा)
