Bad Breath Remedy: तोंडाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंडाच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला इतरांसमोर बोलताना लाज वाटू शकते. तोंडाची दुर्गंधी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने आणि तोंडाची स्वच्छता न केल्याने येते. यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला ही समस्या उद्भवणार नाही. रोज सकाळी अशाप्रकारे काही उपाय केल्याने दिवसभर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीमुळे बाहेर लोकांमध्ये वावरताना अडचणीचे वाटणार नाही.

कोमट पाण्याचा वापर

जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही काही विशिष्ट उपाय करू शकतात. कोमट पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. कोमट पाण्याने तोंड स्वच्छ केल्यामुळे तोंड स्वच्छ होते आणि रात्रीत साचलेले बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.

Award Banner

ऑइल पुलिंग

कधीकधी तोंडाची दुर्गंधी खूप तीव्र असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ऑइल पुलिंग पद्धत वापरू शकता. नारळ किंवा तीळाचं तेल वापरणं सर्वोत्तम आहे. ऑइल पुलिंग करण्यासाठी तोंडात एक चमचा तेल ५ ते १० मिनिटे फिरवा आणि नंतर ते थुकून टाका. ऑइल पुलिंगमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात.

टंग क्लिनिंग

बरेच लोक ब्रश केल्यानंतर जीभ स्वच्छ करणं महत्त्वाचं समजत नाहीत. मात्र, केवळ ब्रश केल्याने आपले तोंड स्वच्छ होत नाही. जीभ बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर पांढरा थर जमा होतो. टंग क्लिनरने जीभ स्वच्छ केल्याने बॅक्टेरिया सहज निघून जातात आणि तुमचा श्वासही ताजा राहतो.

तोंडाच्या दुर्गंधीची अनेक कारणे असू शकतात. तोंडाची अस्वच्छता, जिभेवर बॅक्टेरियाचा जाड थर, वारंवार कोरडे तोंड, गॅस किंवा अपचन सारख्या पोटाच्या समस्या, हिरड्यांचे आजार आणि पायरिया अशी एक ना अनेक कारणं आहेत. काही प्रकरणांमध्ये सतत येणारा दुर्गंध डायबिटीज, किडनी किंवा लिव्हरसंबंधित आजारांचे लक्षण देखील असू शकतो. आयुर्वेदानुसार, तोंडाची दुर्गंधी ही केवळ एक समस्या नाही, तर शरीरातील अंतर्गत असंतुलनाचे लक्षण मानली जाते.