Cooler Cleaning Tips : उन्हाळा जवळ येताच लोक फॅन, एसीसह कूलरचाही तितकाच वापर करतात. उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी कूलर हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण अनेक दिवसांनंतर तुम्ही कूलर जेव्हा चालू करता तेव्हा थंड हवेबरोबरचं एक दुर्गंधीयुक्त वास येतो.हा वास संपूर्ण घरात पसरतो. जर तुमच्या कूलरमधूनही घाणेरडा वास, दुर्गंधी येत असेल तर काळजीचे कारण नाही, तुम्ही कोणतीही मेहनत आणि पैसा खर्च न करता कूलरमधून येणारा कुबट, दुर्गंधीयुक्त वास घालवू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील टिप्स फॉलो कराव्या लागतील.
कूलरमधून कुबट वास का येतो?
कूलर वेळेवर साफ न केल्यास त्यातून दुर्गंधी येऊ लागते. बाहेरील धूळ आणि आद्रता हे देखील कूलरमधून दुर्गंधी येण्यामागचे कारण आहे. यासाठी दर आठवड्याला कूलरमधील पाणी स्वच्छ करावे लागते.
याशिवाय कूलर नियमित साफ न केल्यास त्यातील पाण्यात किडेही वाढू लागतात. यामुळे पाण्याला अतिशय घाण वास येऊ लागतो. यामुळे दर आठवड्याला कूलर साफ करा.
१) संत्र्याची साल
संत्र्याची साल कचऱ्यात फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा वापर कूलरमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरू शकता. यासाठी संत्र्याची साल उन्हात कडकडीत सुकवा आणि तिची बारीक पावडर तयार करा. यात तुम्ही दालचिनी पावडरही मिक्स करू शकता. आता ही तयार पावडर तुम्ही कूलरच्या आत शिंपडा किंवा पाण्यात मिक्स करून स्प्रे करा. यामुळे कुबट वास पसरणार नाही.
२) कडुनिंबाची पानं
कडुलिंबाची पाने दुर्गंधी आणि बॅक्टेरिया या दोन्हींचा नायनाट करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. जर तुमच्या कूलरमधून कुजलेला वास येत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने थोडी कुटून सुती कापडात बांधून ठेवा. यानंतर कापडाची ही पोटली कूलरच्या पाण्यात ठेवा, असे केल्याने पाण्याला दुर्गंधी येणार नाही आणि कीटकांची पैदासही होणार नाही. पण, दर ३-४ दिवसांनी कडुलिंबाची पाने बदलावी लागतील.
३) बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा किचनमधील सफाईसाठी खूप प्रभावी उपाय मानला जातो. याचा वापर तुम्ही कूलरमधील दुर्गंधी दूर करण्यासाठीही करू शकता, यासाठी कूलरच्या पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा, यामुळे कूलरमधील कुबट वास काही मिनिटांत दूर होईल. पण, यासाठी कूलरमधील पाणी सतत बदलत राहावे लागेल.
