Growing Mint At Home : भाजी विक्रेत्याकडून कोथिंबीर, आलं, मिरची घेतल्यानंतर किंवा अगदी भाजी घेतल्यावर आपण फ्री मध्ये पुदिना घेऊन येतो. पण, आता सगळ्याच वस्तूंचे भाव वधारले आहेत. त्यामुळे कोणीच काही फ्री मध्ये द्यायला मागत नाही. म्हणूनच आज आपण आपल्याच घरात पुदिना कसा उगवायचा हे शिकणार आहोत. घरी स्वतः पिकवलेल्या गोष्टीखाणे हे सुख असतं आणि ते अनुभवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्ही पुदिन्याचा ज्यूस, चटणी आणि पिण्याच्या पाण्यात पाने टाकून त्याचे सेवन करण्यासाठी करू शकता.

कुंडी किती मोठी असावी?

तुमच्या घरी रिकामी कुंडी असेल तरीही चालेल. अन्यथा, बाजारातून १२ ते १४ इंचांची कुंडी तुम्ही खरेदी करा. कुंडी जेवढी मोठी आणि रुंद असेल, तेवढी पुदिन्याची वाढ चांगली होईल. पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीच्या तळाशी छिद्रे असणे महत्त्वाचे आहे. यामुळे रोपाचे आयुष्य आणखीन वाढते.

घरी माती तयार करा

पुदिन्याच्या चांगल्या वाढीसाठी हलकी, सुपीक माती आवश्यक आहे. त्यामुळे घरीच माती तयार करा. ४० टक्के बागेतील, ३० टक्के शेणखत किंवा कंपोस्ट आणि ३० टक्के कोकोपीट मिसळून कुंडीत टाका. हे मिश्रण रोपासाठी माती मऊ आणि पोषक बनवण्यास मदत करणार आहे.

पुदिन्याची फांदी किंवा देठ कशी लावावी?

जर कुंडीत पुदिन्याची फांदी लावायची असेल तर प्रथम पाण्यात भिजवून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर फांदी किंवा देठ मातीत २ ते ३ इंच खोलवर गाडा आणि त्यावर हलके पाणी शिंपडा. सुमारे एका आठवड्यानंतर, पुदिन्याच्या रोपाला मुळे फुटू लागतील आणि देठांमधून पाने बाहेर येऊ लागतील. जर तुम्हाला बियांपासून पुदिन्याची रोपे वाढवायची असतील, तर एका कुंडीत ४० टक्के बागेतील माती, ३० टक्के कोकोपीट आणि ३० टक्के गांडूळ खत मिसळा. बिया २ ते ३ इंच खोल ठेवा आणि मातीने झाका. मातीला जास्त पाणी देऊ नका; ती ओलसर राहिली पाहिजेत.

पुदिन्याच्या झाडाला सूर्यप्रकाश किती आवश्यक असतो?

पुदिन्याच्या रोपांना ५ ते ६ तास नियमित सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सकाळचा सूर्यप्रकाश उत्तम असतो. कारण तीव्र सूर्यप्रकाशामुळे पाने सुकू शकतात. यासाठी, सकाळचा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा. काही दिवसांत नवीन रोपे उगवतील. एकदा हिरवी पाने दिसू लागली की, तुम्ही ती तोडून वापरू शकता.

खत कधी घालावे?

तुम्ही दर १५ ते २० दिवसांनी पुदिन्याच्या कुंडीत सेंद्रिय खत घालू शकता. तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून बनवलेले खत देखील वापरू शकता. त्याच वेळी, दररोज रोपाला कमी प्रमाणात पाणी द्या. पण, लक्षात ठेवा की, जास्त पाणी दिल्याने मुळांना इजा होऊ शकते.

कीटकांपासून संरक्षण कसे करावे?

कधीकधी पुदिन्यावर कीटकांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी, कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून झाडांवर फवारल्यास कीटक मरू शकतात.

(टीप : या लेखात दिलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहिती आहे. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा शंकांसाठी तज्ञांचा सल्ला घ्या)