How To Identify Real and Fake Mangoes Easy Tips: उन्हाळा सुरू झाला की, सगळ्यांना रसाळ, गोड आणि सुगंधी आंब्यांचे वेध लागतात. बाजारात आंब्यांची रेलचेल दिसू लागते आणि प्रत्येक जण उत्तम आंबा निवडण्याचा प्रयत्न करतो. पण, याच हंगामात एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे… बाजारात मोठ्या प्रमाणात कृत्रिमरीत्या पिकवलेले किंवा ‘बनावट’ आंबे विकले जात आहेत.
पहिल्या नजरेत हे आंबे आकर्षक, चमकदार आणि एकसारख्या रंगाचे दिसतात; पण त्या दिसण्यामागे लपलेलं सत्य मात्र वेगळंच असू शकतं. पोषण तज्ज्ञ राशी चौधरी यांनी याबाबत इशारा देत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
त्या सांगतात की, आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड या रसायनाचा वापर केला जातो. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या रसायनावर बंदी घातलेली आहे. कारण- त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. या प्रक्रियेतून आंब्यांमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फिन यांसारख्या हानिकारक वायूंचे अंश राहू शकतात.
धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक बाजारात अजूनही काही अंदाजांनुसार ४० टक्क्यांपर्यंत आंबे अशा पद्धतीने पिकवले जातात. त्यामुळे ग्राहकांनी आंबे घेताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते.
आंबा खरा की कृत्रिम? ओळखायचे सोपे उपाय
आता प्रश्न असा तुम्ही घेतलेला आंबा नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे की कृत्रिम? यासाठी काही सोप्या, पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवता येतात.
१. रंगावरून ओळखा
खूपच परफेक्ट, एकसारखा पिवळा आणि प्लास्टिकसारखा चमकदार दिसणारा आंबा संशयास्पद असू शकतो. नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा सहसा थोडा पिवळा-हिरवा मिश्र रंगाचा असतो. त्याचा रंग एकसारखा नसून थोडा पॅची दिसतो.
२. सुगंध तपासा
आंबा घेताना त्याचा देठाजवळ वास घ्या. जर काहीच वास येत नसेल किंवा रासायनिक वास जाणवत असेल, तर तो आंबा कृत्रिमरीत्या पिकवलेला असू शकतो. खरा आंबा मात्र गोड, ताज्या फळांचा नैसर्गिक सुगंध देतो.
३. आतून कसा आहे ते पाहा
आंबा कापल्यावर त्याचा खरा चेहरा दिसतो. बाहेरून मऊ दिसणारा, पण आतून फिकट, रबरासारखा किंवा चवहीन गर असेल, तर तो आंबा नैसर्गिक नाही. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यात गर दाट, रसाळ व गोड असतो.
आरोग्यावर होणारे परिणाम
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांचा परिणाम शरीरावर हळूहळू होऊ शकतो. पचनसंस्थेवर परिणाम होणे, हार्मोन्समध्ये बिघाड होणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे फक्त चव किंवा दिसण्यावर न जाता, आरोग्याचा विचार करून योग्य निवड करणे आवश्यक आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
जर तुम्हाला शंका वाटत असेल, तर तुम्ही आंबे काही तास पाण्यात भिजवून ठेवू शकता. त्यामुळे त्यावरील रासायनिक अंश काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तसेच, कच्चे आंबे विकत घेऊन घरी नैसर्गिक पद्धतीने पिकवणे हा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो, जसा आपल्या आजी-आजोबांच्या काळात केला जायचा.
शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा…
आंबे खरेदी करताना फक्त त्याचा रंग किंवा आकार पाहून निर्णय घेऊ नका. थोडी जागरूकता ठेवली, तर तुम्ही खर, स्वादिष्ट आणि सुरक्षित आंब निवडू शकता.
योग्य माहितीमुळे तुम्ही केवळ स्वतःचेच आरोग्य जपणार नाही, तर प्रामाणिक शेतकरी आणि विक्रेत्यांनाही पाठबळ देऊ शकता.
येथे पाहा व्हिडीओ
डिस्क्लेमर :
ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. त्याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय समजू नये. कोणत्याही शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
